रायपूर: छत्तीसगडमधील नारायणपूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज शनिवारी 24 रोजी चकमक झाली आहे. यात पाच नक्षलवाद्यांन ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. डीआरजीचे दोन जवान या चकमकी दरम्यान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी जवानांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सकाळपासून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. जवानांनी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.
सर्च ऑपरेशन करत असताना काही नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या जवानांनीही गोळीबार केला. चकमकीदरम्यान दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बागनदी ठाण्यांतर्गत असलेल्या बोरतलाव येथे याआधी काही दिवसांपूर्वी चकमक झाली होती. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांत चकमक उडून त्यामध्ये सात नक्षलवादी ठार झाले होते.