कमांडरसह पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
लष्कराशी धुमश्चक्रीत पाच नागरिकही ठार
कालपासून बेपत्ता प्राध्यापकाचाही चकमकीत खात्मा
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियाननजीकच्या बडीगाम जैनपुरा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांच्या उडालेल्या चकमकीत रविवारी हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पद्दार यांच्यासह काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापक मोहम्मद रफी भट्टसह पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले. सुरक्षा दलाला या गावात दहशतवादी लपून बसल्याची खबर मिळाली होती. त्यांना घेराव घालून शरण येण्याचे आवाहन विनंती जम्मू-काश्मीरचे पोलिस उपमहानिरीक्षक एस. पी. वैद्य यांनी केले. मात्र, सद्दाम पद्दार याच्यासह इतर दहशतवाद्यांनी सैन्यदलावर गोळीबार सुरु केला. त्यांना लष्करी जवानांनीदेखील चोख प्रत्युत्तर दिले. त्यात सर्वच्या सर्व दहशतवादी मारले गेले, अशी माहिती डीजीपी वैद्य यांनी दिली. मारण्यात आलेला प्राध्यापक भट्ट हा शनिवारपासून बेपत्ता होता. ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेत असताना त्याचाही मृतदेह तेथे आढळून आला. दरम्यान, चकमक सुरु असताना स्थानिक युवकांसह नागरिकांनी सैन्यदलावर जोरदार दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा जवानांनी अश्रुधुराचे नळकांडी डागली. यावेळी उडालेल्या धुमश्चक्रीत पाच नागरिकदेखील ठार झाले आहेत. त्यानंतर काश्मीर खोर्यातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण बनले होते. ठार झालेल्या प्राध्यापक भट्ट हा काही दिवसांपूर्वीच दहशतवादी कारवायांत सामील झाला होता. तो गुपचूप हिजबुल कमांडर सद्दाम पद्दारशी संपर्क साधत होता. तर शनिवारपासून तो गायब होता, अशी माहितीही डीजीपी वैद्य यांनी दिली आहे. या कारवाईने हिजबुलचा कमांडर बुर्हाण वणी याच्या संपूर्ण टीमचा खात्मा करण्यात सैन्यास यश आले असून, हिजबुल मुजाहिद्दीनचे कंबरडे मोडले गेले आहे. ऑपरेशन ऑलआउट मोहिमेस मिळालेले हे दिलासादायक यश मानले जात आहे.
शरण येण्याचे आवाहन धुडकावले!
जैनपुरा भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्यदलाला मिळाली होती. त्यानुसार या भागात शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सद्दाम पद्दार यांच्यासह चार दहशतवादी व दहशतवादी कारवायांत सक्रीय झालेला प्राध्यापक भट्ट हा एका इमारतीत लपून बसल्याचे दिसून आले. या सर्वांना शरण येण्याचे आवाहन डीजीपी वैद्य व त्यांच्या सहकार्यांनी केले. भट्ट व पद्दार याच्या कुटुंबीयांनाही घटनास्थळी बोलावून त्यांनाही शरण येण्याचे आवाहन करण्याचे सांगितले. त्यानुसार, कुटुंबीयांनीदेखील शस्त्रे खाली टाकून शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, शरण येण्याऐवजी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सैन्यदलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाचही दहशतवादी ठार झाले. ही कारवाई सुरु असताना काश्मिरी युवक व नागरिकांनी सैन्यदलावर जोरदार दगडफेक सुरु केली. या युवकांना पांगविण्यासाठी सुरक्षा जवानांनी अश्रुधुराची नळकांडी डागली. यावेळी उडालेल्या जोरदार धुमश्चक्रीत पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर काश्मीर खोर्यात जोरदार हिंसाचार उफळून आला होता. ठार झालेला प्राध्यापक भट्ट हा काश्मीर विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय शिकवित होता. काही दिवसांपूर्वीच तो सद्दाम पद्दार याच्या संपर्कात आला. शनिवारी त्याने आपण अल्लाहला भेटण्यास जात आहोत, अशा आशयाचा दूरध्वनी कुटुंबीयांना केला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता.
सैन्यदल, सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा
ठार दहशतवादी तौसिफ शेख, आदिल मलिक, बिलावल उर्फ मौलवी हे काश्मीरचे रहिवासी होते
अधिकारी, व कुटुंबीयांनी शरण येण्याचे आवाहन करुनही दहशतवादी गोळीबार करत राहिले
प्रा. भट्ट गायब झाल्यानंतर कुलगुरुंनी डीजीपी वैद्यांना पत्र लिहून त्याच्या शोधाची विनंती केली होती