सातपुड्याच्या कुशीत दारू तस्करीचा महापूर ; महाराष्ट्रात बंदी असलेल्या परराज्यातील दारू येते कशी ?
मुख्य सूत्रधार मोकाटच फिरताहेत
जनशक्ती विशेष | रवींद्र चव्हाण | नंदुरबार | जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत बनावट दारू बरोबरच महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या देशी-विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे उघड होत आहे. गेल्या दीड महिन्यात कोट्यावधी रुपयांची दारू पकडण्यात आली आहे. मात्र, या दारू तस्करीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत कोणतीही यंत्रणा पोहोचत नसल्याने अनेकवेळा कारवाई होऊन दारूच्या हेराफेरीची मालिका सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांच्या सीमेवर आहे. मध्यप्रदेशला लागूनच शहादा व धडगाव तालुका आहे. याच तालुक्याच्या हद्दीतून दारूने भरलेले मोठ मोठली वाहने रवाना होत असतात. धडगाव तालुका सातपुड्याच्या कुशीत वसला आहे. शिवाय या भागात रस्त्यांची सोय बर्यापैकी झाल्याने दारू तस्करीसाठी हा मार्ग सुकर बनला आहे. त्यामुळेच आतापर्यंत या भागातून दारू भरून जाणारी वाहने पकडली गेली आहेत. गेल्या नोव्हेंबर महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे व मुंबई येथील भरारी पथकाने शहादा शहर तसेच तालुक्यात मध्यप्रदेश राज्यात निर्मित आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुमारे एक कोटी रुपयांची बियर पकडण्याची कारवाई करण्यात आली होती. बाहेरचे पथक या दुर्गम भागात येऊन कारवाई करू शकतात. मात्र, स्थानिक यंत्रणेला याची माहिती राहत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. या भागातून बेकायदेशीर दारूची वाहने जातात याची माहिती चारशे किलोमीटर दूर असलेल्या मुंबई येथील भरारी पथकाला मिळते पण स्थानिक जिल्हा कार्यालय व कर्मचार्यांना ती का मिळत नाही? यामागील काही गौडबंगाल तर नाही ना, याचाही शोध घेणे महत्वाचे आहे. नंदुरबार जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे सहाही तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यप्रदेशातील बनावट मद्यविक्री होत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत. मध्यप्रदेशातील बनावट दारूचा कायमस्वरूपी नायनाट करण्यासाठी नंदुरबारचा दारूबंदी विभाग पाऊल उचलणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई व ठाणे येथील भरारी पथकाने 13 नोव्हेंबर रोजी शहादा तहसील कार्यालयासमोर तसेच 28 नोव्हेंबर रोजी शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन येथील नदीपात्रात सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश राज्य निर्मित बेकायदेशीर बियर साठा मिळून आला. शहादा तालुका हा मध्यप्रदेश व गुजरात या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे खेडदिगर येथे कार्यालय आहे. त्या रस्त्यावरूनच दारूची वाहने जात असल्याने या विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. खेडदिगर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे.
मुख्य सुत्रधार कधी सापडणार?
मध्यप्रदेशातील दारू महाराष्ट्रात येते कशी? याच रस्त्यावर पुढे धडगावकडे जात असताना अगदी रस्त्याच्या पलीकडे असलेले म्हसावद पोलीस ठाणे लागते. असे असतांना धडगावकडे जाणारी अवैध दारू वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून होते की, ती वाहने पास करण्यासाठी मदत केली जाते, याचाही शोध घेणे गरजेचे आहे. गेल्या दीड महिन्यात कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर दारू पकडण्यात आली आहे. वाहन चालक व अन्य लोकांवर कारवाई होते. परंतु दारू पुरवठा करणार्या व ती घेणार्या मुख्य सुत्रधारांपर्यंत ना पोलीस यंत्रणा पोहोचते ना राज्य उत्पादन शुल्क विभाग पोहोचते, हीच हतबलता असल्याने हा प्रकार कायम सुरूच राहणार आहे, हे मात्र तेवढेच खरे.