फ्लोरिडा-अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जॅक्सनविल परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४ ठार तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. जॅक्सनविल लँडिंग परिसरातील एका रेस्तराँमध्ये हल्लेखोरांनी जमावावर अचानक गोळीबार केला. घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी जॅक्सनविलकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले असून गोळीबार करणाऱ्या संशयित हल्लेखोराला पोलिसांनी यमसदनी धाडले आहे. दुसऱ्या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.
जॅक्सनविल येथील गोळीबारात जखमी व्यक्तींना स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक संशयित हल्लेखोर ठार झाला आहे. आणखी एका हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. घटनेनंतर पोलिसांचे पथक लोकांच्या बचावासाठी आणि दुसऱ्या हल्लेखोराच्या शोधासाठी तैनात करण्यात आले आहे.
पोलिसांनी घटनेनंतर जॅक्सनविल परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद केले. त्याचबरोबर नागरिकांसाठी विशेष हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले असून लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते वर्दळीचे ठिकाण आहे. सुटीचा दिवस असल्याने अनेक लोक येथे आले होते. दरम्यान, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.