चक्क माजी सरन्यायाधीशांनाच ऑनलाईन गंडा; एक लाखाची फसवणूक

0

नवी दिल्ली: सध्या बोगस फोन कॉल तसेच विविध प्रकारे हॅक करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. पोलिसांकडून अशा वैयक्तिक माहिती मागण्यासाठी आलेल्या फोन कॉल्सना उत्तर न देण्याचे आवाहन केले जात असतांनाच चक्क सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश आर.एम.लोढा यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. त्यांना एक लाखात गंडविण्यात आले आहे. त्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

लोढा यांचे मित्र बी.पी.सिंह यांचे ई-मेल अकाऊंट हॅक करण्यात आले होते. दिल्लीमधील पंचशील पार्क येथे वास्तव्यास असणारे माजी सरन्यायाधीश लोढा तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस सहाय्यक आयुक्तांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल कार्यालयात पोहोचले असता ही घटना उघडकीस आली. मालविया नगर पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे.’

१९ एप्रिल रोजी मला बी पी सिंह यांच्याकडून एक मेल आला. मेलमध्ये आपल्या चुलत भावाच्या उपचारासाठी एक लाखांची तात्काळ गरज असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर मी तात्काळ ऑनलाइन व्यवहार करत १ लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले’, असे लोढा यांनी पोलिसांना सांगितले आहे. न्यायाधीश बी.पी.सिंह यांची ई-मेल सेवा पुर्ववत झाल्यानंतर ३० मे रोजी त्यांनी आपल्या संपर्क यादीत असणाऱ्या सर्वांना मेल पाठवत ई-मेल आयडी हॅक झाला होता अशी माहिती दिली. जेव्हा लोढा यांनी बी पी सिंह यांनी पाठवलेला मेल वाचला तेव्हा त्यांना आपली १ लाखांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.