नवी दिल्ली: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांचा चार दिवसांपूर्वी संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. दरम्यान त्यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी रोहित शेखर यांच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांच्या आईने रोहित आणि त्यांच्या पत्नीत वाद होत होते असे सांगितले. रोहित शेखर हे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीत राहात होते. रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. मॅक्स रुग्णालयामध्ये दूरध्वनी आला, त्यानंतर ऍम्ब्युलन्समधून रोहित शेखर यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. शवविच्छेदनानंतर रोहित शेखर यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरुन झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालामध्ये काढण्यात आला आहे. हा अनैसर्गिक मृत्यू असून हत्या केल्याचा संशय वर्तविण्यात आला आहे. या आधारे दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सीआयडीकडे सुपूर्द केला आहे.