BREAKING: माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन !

0

नवी दिल्ली: देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज अखेर निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

महाराज किशन आणि रत्नप्रभा जेटली यांचे चिरंजीव असलेल्या अरुण जेटली यांचा जन्म नवी दिल्ली २८ डिसेंबर १९५२ मध्ये झाला. त्यांनी श्रीराम वाणिज्य महाविद्यालयातून बी कॉम तर दिल्ली विद्यापीठातून लॉ’ची पदवी घेतली. त्यांनी २६ मे २०१४ ते १४ मे २०१८ या काळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून काम केले. शिवाय १३मार्च २०१७ ते ३ सप्टेंबर २०१७या काळात त्यांनी संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबदारी स्वीकारली. ९ नोव्हेंबर २०१४ ते ५ जुलै २०१६ याकाळात माहिती व प्रसारण खात्याची धुराही त्यांच्याकडे होते. याशिवाय ३ जून २००९ ते २६ मे २०१४ या काळात ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते.

नोटबंदी, वस्तू व सेवा कर (जीएसटी), रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द करून तो देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात समाविष्ट करणे, देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा धाडसी निर्णय त्यांचा कार्यकाळात झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोडी विदेश दौऱ्यावर असून लवकरच ते दौरा रद्द करून भारतात परततील असे बोलले जात आहे. दरम्यान अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे कळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हैद्रबाद दौरा रद्द केला असून ते दिल्लीकडे रवाना झाले आहे.