प्रदीप चव्हाण,
जळगाव: मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेनेत चढाओढ सुरु असल्याने निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतर देखील नवीन सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. दोन दिवसात सरकार स्थापन झाले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुका लागतील. सध्याच्या राजकीय घडामोडीवरून मध्यावधी निवडणुकीची शक्यता देखील वर्तविली जात आहे. मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील काही पक्षाने दिले आहे. दरम्यान जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे देखील मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. आजपासून जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव देवकर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यासाठी दोन दिवसांचा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावरून ते मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येते.
तुरुंगवारीमुळे संधी हुकली
मध्यावधी निवडणुका झाल्या तर आपल्या पक्षाला आणि आपल्यालाच फायदा होईल असेही त्यांनी बोलून दाखविले आहे. गेल्या दोन वर्षापासून जळगाव ग्रामीण मतदार संघातून गुलाबराव देवकर विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करत होते. त्यातच लोकसभेसाठी राष्ट्रवादीने त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र यात भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर ते पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले मात्र दरम्यानच्या काळात घरकुल घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक झाली आणि तुरुंगात जावे लागले. त्यामुळे त्यांची विधानसभेची संधी हुकली. विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाली, परंतु तत्पर्वी राष्ट्रवादीने जळगाव ग्रामीणमधून पुष्पलता महाजन यांना उमेदवारी दिली. त्यामुळे देवकारांची संधी हुकली.
पराभूत उमेदवारांना आशेचे किरण
भाजपचे नेते मंत्री जयकुमार रावळ यांनी देखील धुळे जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वी दिले होते. त्यावरूनच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मध्यावधीची शक्यता असल्याने पराभूत उमेदवार आणि इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मध्यावधी निवडणुका लागाव्यात अशी इच्छा पराभूत उमेदवार आणि इच्छुकांची आहे.