नवी दिल्ली: माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी समाजवादी पक्षात असलेल्या नीरज शेखर यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच भाजपाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.
नीरज शेखर हे दोनवेळा लोकसभेचे आणि एकदा राज्यसभेचे सदस्य राहिलेले आहेत. 2007 मध्ये चंद्रशेखर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी बलिया लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांनी विजय मिळवला. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र समाजवादी पक्षाने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती केली होती. त्यांचा कार्यकाळ 2020 मध्ये समाप्त होणार होता.
नीरज शेखर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींनी स्वीकारला आहे. आज राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, ”नीरज शेखर यांच्या राजीनाम्याची मी पडताळणी केली आहे. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली आहे. नीरज शेखर यांनी हा राजीनामा स्वेच्छेने दिला असल्याचे माझ्या पडताळणीत समोर आले आहे. त्यामुळे मी हा राजीनामा 15 जुलै रोजी स्वीकारला आहे.”