माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

0

नवी दिल्ली: भाजप नेते माजी केंद्रीयमंत्री जसवंत सिंह यांचे आज रविवारी २७ रोजी हृदय विकाराच्या धक्काने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. जसवंत सिंह यांचे आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निधन झाले. २५ जून रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. जसवंत सिंह यांचं निधनाने देशभरात शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी देखील जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

जसवंत सिंह माजी सैन्य दलातील अधिकारी होते. ते भाजपचे संस्थापक सदस्य होते. त्यांना प्रदीर्घ संसदीय कार्यकाळ लाभला आहे. १९८० पासून २०१४ पर्यंत ते संसदेत प्रतिनिधित्व करत होते. कधी लोकसभा तर कधी राज्यसभेत त्यांनी नेतृत्व केले. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. अर्थमंत्री, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री म्हणून त्यानी कामगिरी केली आहे.

“जसवंत सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मोदींनी, जसवंत सिंह यांनी संपूर्ण मन लावून देशाची सेवा केली. अगोदर एका सैनिकाच्या रुपात आणि नंतर राजकारणातील आपल्या प्रदीर्घ कार्यकाळाद्वारे. अटलजींच्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी महत्वपूर्ण विभागांचे काम पाहिले आणि अर्थ, रक्षा व परराष्ट्र मुद्यांची जगभरात एक मजबूत छाप सोडली. त्यांच्या निधनाने दुःखी आहे असे ट्वीट केले आहे.”

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “ जसवंत सिंह हे त्यांच्या बौद्धिक क्षमतांसाठी आणि देशाच्या सेवेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांनी राजस्थानमध्ये भाजपाला बळकट करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. या दुःखाच्या प्रसंगी मी त्यांच्या परिवार व समर्थकांच्या बरोबर आहे.”