मुंबई- कर्ज घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी काहीशी चिंताजनक बातमी आहे. कर्जावरील व्याजाची रक्कम वाढणार आहे. द्वैमासिक पतधोरणाचा आढावा येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर व्याजदरात ०.२५ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र त्याआधीच काही कंपन्यांनी आपल्या व्याजदरात वाढ झाल्याचे जाहीर केले आहे. मागच्या काही महिन्यात सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय, पंजाब नॅशनल बँक आणि एचडीएफसी या बँकांच्या व्याजदरात वाढ होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
देशातील सर्वात मोठ्या असलेल्या एसबीआयच्या व्याजदरात ०.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोमवारी ८ ऑक्टोबरपासून हा नवीन दर लागू होणार आहे. तर आयसीआयसीआय बँकेचे कर्ज ०.१ टक्क्यांनी वाढणार आहे. पंजाब नॅशनल बँकेने आपल्या व्याजदरात ०.२ टक्के तर एचडीएफसीने ०.१० टक्क्यानी वाढ करायचे ठरवले आहे. या वाढीमुळे विविध कर्जांवरील व्याजदर साधारण ८.८० ते ९.०५ इतके असतील. प्रत्यक्षात रिझर्व्ह बँकेने आपल्या धोरणात बदल केल्यानंतर बँका आपले व्याजदर वाढवतात. मात्र यावेळी रिझर्व्ह बँकेची बैठक होण्याच्या आधीच व्याजदरात वाढ करण्यात आल्याचे बँकांनी जाहीर केले आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो रेट ०.२५ टक्के इतकी वाढ केली होती. रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे व्याजदरांत सातत्याने वाढ होत आहे.