विजेच्या प्रवाहाने चार शेळ्या ठार – सावतर निभोंरा येथील घटना
सुदैवाने जिवीत हानी टळली - शेळी पालकाचे हजारो रुपयांचे नुकसान
वरणगांव । प्रतिनिधी
पत्री शेडमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने चार शेळ्या ठार झाल्या सुदैवाने मानवी जिवीत हानी टळली . हि घटना सकाळी लक्षात आली . तर या घटनेत शेळी पालकाचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले .
सावतर – निंभोरा येथील भगवान विष्णू कोळी हे शेळी पालनाचा व्यवसाय करतात . ते आपल्या जवळील शेळ्या दिवसभर जंगलात चारून आणल्यानंतर सांयकाळी आपल्या घराच्या मागील बाजुस पत्रीशेड मध्ये बांधून ठेवतात . याचप्रमाणे त्यांनी शुक्रवारी सांयकाळी घराच्या मागील बाजुस शेळ्या बांधून परिवारासह पुढच्या घरात झोपले होते . मात्र, सकाळी ५ वाजेच्या सुमारास घराशेजारील माणसाला एक शेळी पत्रीशेडच्या अँगलला चिटकुन तडफडत असल्याचे दिसल्याने त्यांनी शेळी पालकाला आवाज देवुन जागृत केले . यावेळी शेजारील नागरीकांनी त्यांच्या घरातील विजपुरवठा खंडीत केला . मात्र, या १६ पैकी चार शेळ्या विजेच्या धक्क्याने जागीच ठार झाल्या . या घटनेत भगवान कोळी यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने सर्वांनी दुःख व्यक्त केले .
मानवी जिवीत हानी टळली
भगवान कोळी यांचे टिनपत्राचे घर असुन त्यांनी घराच्या मागील पत्री खोलीत शेळ्या बांधून ते पुढील खोलीत परिवारासह झोपले होते . मात्र, शेजारील माणसाला शेळीला विजप्रवाहाचा धक्का लागल्याचे लक्षात येताच त्यांनी भगवान कोळी यांना सावध केल्याने सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली .
वायर कट झाल्याचा संशय
भगवान कोळी यांचे घर टिनपत्राचे असल्याने उन्हाच्या तापमानामुळे अथवा वाहत असलेल्या वाऱ्यामुळे वायरचे टिनपत्राला घर्षण होऊन वायरमधील विजेचा प्रवाह टिनपत्रे लोखंडी अँगल व जाळी मध्ये उतरला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे . मात्र, नेमके कारण कुणालाही सांगता येत नसुन या घटनेत कोळी यांचे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात . तर या घटनेमुळे इतरांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे .