हैद्राबाद-तेलंगण आणि कर्नाटकमध्ये गेल्या आठवड्यात चार जणांची जमावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या चारही जणांवर मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय होता. व्हॉट्स अॅपवर फिरणारे फेक व्हिडिओ आणि खोट्या मेसेज हे त्या चौघांच्या जिवावर बेतले आहे.
जुने फेक व्हिडिओ
तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे. मुलं पळवणाऱ्या टोळीपासून सावधान, या टोळीतील सदस्य एकेकट्याने परिसरात फिरत असून ते लहान मुलांचे अपहरण करत आहे, अशा आशयाचे मेसेज फिरत असून या मेसेजसोबत मुलांच्या अपहरणाचे जुने किंवा फेक व्हिडिओज देखील शेअर केले जात आहे. यामुळे तीन राज्यांमधील अनेक जिल्ह्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या महिन्यात तमिळनाडूत घटना
गेल्या आठवडाभरात कर्नाटक आणि तेलंगणमध्ये जमावाने चार जणांची हत्या केली. मुलं पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयातून जमावाने त्यांना अमानूष मारहाण केली होती. या चारही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. तर गेल्या १० दिवसांत आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये याच संशयातून जमावाने एखाद्याला विजेचे खांब किंवा झाडाला बांधून बेदम मारहाण केल्याच्या १० घटना घडल्या आहेत. तामिळनाडूमध्ये गेल्या महिन्यात अशा स्वरुपाच्या घटनांमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला.
गुरुवारी गुंटूरमध्ये जमावाने एका महिलेला बेदम मारहाण केली. तर भद्रादी कोठागुदेम जिल्ह्यातील सरापाका येथे मनोरुग्ण महिलेला मुल पळवणाऱ्या गँगची सदस्य समजून जमावाने झाडाला बांधून मारहाण केली. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्या महिलेची सुटका झाली. याशिवाय अलावा अरमूर मंडल येथे एका हिंदी भाषिक आणि निजाबामादमध्ये मूकबधीर तरुणाला याच संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की शहरात किंवा गावात येणाऱ्या नवख्या लोकांकडे संशयानेच बघितले जाते, असे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. कर्नाटकमध्येही बुधवारी २६ वर्षांच्या तरुणाची जमावाने हत्या केली. पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवली असता तो राजस्थानचा रहिवासी असल्याचे समोर आले. कालूराम असे त्याचे नाव होते. कालूराम राजस्थानचा असून कर्नाटकात पान विकण्याचे काम तो करायचा. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नव्हती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.
१६ मे रोजी रायचूरमध्येही याच संशयातून एका वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. पोलीस तपासात ती महिला मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे व्हॉट्स अॅपवरील एक खोटा संदेश किंवा व्हिडिओ समाजात कशी अफवा पसरवू शकतो आणि त्याचे विपरित परिणाम काय होऊ शकतात, हे या घटनांमधून समोर येते.