नंदुरबार । शहरासह शहादा आणि नवापूर तालुक्यातून पोलिसांनी चार विनापरवाना गावठी बनावटीच्या पिस्तूलसह पाच जिवंत काडतूस व चार तलवारी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी सहा जणांविरूध्द नंदुरबार, नवापूर, शहादा या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे, नंदुरबार शहरातील टापु परिसर ते रेल्वे स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर विजय काशिनाथ जाधव हा त्याच्या ताब्यातील 55 हजार रूपये किंमतीच्या दोन गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल व 1500 रूपये किंमतीच्या तीन जिवंत काडतूस असा 56 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल कब्जात बाळगतांना आढळला. म्हणून पोलीस शिपाई योगेश पवार यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय काशिनाथ जाधव रा.सेंधवा (जि.बडवानी) याच्याविरूध्द भारतीय हत्यार कलम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तपास सपोनि महेश माळी करीत आहेत.
नवापूर शहरातील लखानी पार्क परिसरात देवळफळी ते लहान चिंचपाडा जाणार्या रस्त्यालगत जगन्नाथ प्रकाश गोंडा हा त्याच्या ताब्यात 25 हजार रूपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व 10 हजार रूपये किंमतीचा दोन पिवळया धातुचे काडतूस असा 26 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल त्याच्याजवळ बाळगतांना आढळून आला. म्हणून पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात जगन्नाथ प्रकाश गोंडा (ह.मु. लखानी पार्क, रा.कलासुतार, ओडीसा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रवीण कोळी करीत आहेत. नवापूर शहरातील देवळफळी चौफुली येथे राहुल संजय गावित हा त्याच्या ताब्यात 400 रूपये लोखंडी धारदार तलवार विनापरवाना त्याच्या कब्जात बाळगतांना आढळून आला. म्हणून पो.कॉ. दादाभाऊ लोटन वाघ यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात राहुल संजय गावित (रा.चिंचपाडाफळ्या, ता.नवापूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रवीण कोळी करीत आहेत. नवापूर तालुक्यातील चितवी येथे राहणार्या तुकाराम शंकर गावित याच्या घरातून 1500 रूपये किंमतीची लोखंडी तलवार पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी पोशि. राजेंद्र काटके यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात तुकाराम शंकर गावित याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.हे.कॉ. अरूण कोकणी करीत आहेत.
शहाद्यात पिस्तूल, काडतूससह तलवार जप्त
शहादा शहरातील शिरूड चौफुली समोरील रस्त्यावर सचिन दिलीप तांबोळी हा अवैधरित्या 25 हजार रूपये किंमतीची एक गावठी बनावटी लोखंडी पिस्तूल व 500 रूपये किंमतीचे एक जिवंत काडतूस असा 25 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल कब्जात बाळगुन आला. याप्रकरणी पोशि विजय धिवरे यांच्या फिर्यादीवरून सचिन दिलीप तांबोळी (रा.शिवाजीनगर, शहादा) याच्याविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकूर करीत आहेत. तसेच शहादा शहरातील जुनी भाजीमंडी परिसरात गोकुळ सुनील सोनवणे हा त्याच्या ताब्यात तीन हजार रूपये किंमतीची एक लोखंडी तलवार कब्जात बाळगतांना आढळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई भरत उगले याच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गोकुळ सुनील सोनवणे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोकॉ.अशोक कोळी करीत आहेत.