नवी दिल्ली- सीबीआयमध्ये सुरू असलेला वाद अधिकच वाढत चालला आहे. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या घराबाहेरून चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या चौघांकडे इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीचे ओळखपत्र मिळाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. ताब्यात घेतलेले संशयीत आलोक वर्मा यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून रात्रीपासून हे चौघे वर्मा यांच्या घराबाहेर फेऱ्या मारत असल्याचे सांगितले जात आहे.
#WATCH: Earlier visuals of two of the four people (who were seen outside the residence of #AlokVerma) being taken for questioning. #CBI #Delhi pic.twitter.com/2KnqNfrnH0
— ANI (@ANI) October 25, 2018
सीबीआयच्या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांनी एकामेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. केंद्र सरकारने या दोघांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तर, आलोक वर्मा यांच्या जागी एम नागेश्वर राव यांच्याकडे प्रभारी संचालकपदाचा कारभार सोपवला आहे. याशिवाय 13 अन्य अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. दरम्यान, आलोक वर्मा यांनी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणी सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवीली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने सीबीआयच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचा अधिकार आम्हाला नसल्याचं स्पष्ट केलं असून केंद्रीय दक्षता आयोगाच्या सल्ल्यानुसार एसआयटी याबाबत चौकशी करेल असं सांगितलं आहे.