राफेल प्रकरणी फ्रान्सने कॉंग्रेसचा भ्रष्ट्राचाराचा आरोप फेटाळला

0

नवी दिल्ली-राफेल कराराप्रकरणी होत असलेल्या आरोपाला आणखी नवीन वळण लागले आहे. फ्रान्स सरकारने काँग्रेसचा भ्रष्टाचाराचा दावा फेटाळला आहे. राफेलची ३६ विमाने ५८ हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या या करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला होता, जो भाजपाने तात्काळ फेटाळला होता. नॅशनल हेराल्ड या काँग्रेसशी संबंधित वृत्तपत्राने आरोप केला की फ्रान्स सरकारने भारताच्या अर्ध्या किमतीत हीच विमाने या कंपनीकडून खरेदी केली आहेत. त्यामुळे भारताने राफेलसाठी दुप्पट किंमत मोजल्याचा हा आरोप होता, जो फ्रान्स सरकारने फेटाळला आहे.

फ्रान्स सरकारने २८ राफेल विमाने खरेदी केल्याचा व त्यासाठी भारतापेक्षा अर्धी किंमत मोजल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या वृत्ताची तात्काळ दखल घेत फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे की, फ्रान्स सरकारची सदर मागणी राफेल एफ-४ च्या नूतनीकरणासाठी होती आणि भारताने घेतल्याप्रमाणे नवीन विमानांसाठी नव्हती. त्यामुळे ही नवीन विमानांची ऑर्डर नसून आधीच दिलेल्या ऑर्डरमध्ये केलेली वाढीव मागणी आहे असे फ्रान्सचे भारतातील राजदूत अलेक्झांडर झिगलर यांनी सांगितले आहे.