मुंबई: दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने ‘लुटता कशाला फुकटच न्या’ म्हणत दुध फुकट वाटण्याचा कार्यक्रम राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सुरु झाला असून या आंदोलनाच्या अंतर्गत दूध प्यायला खास आमंत्रण दिली जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते अजित नवले यांनी दिली. भाजपचे आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींना दूध मोफत दिले जाणार असल्याचे नवले यांनी सांगितले.
दुधाला सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रतिलिटर किमान २७ रुपये भाव द्या या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलनाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. लुटता कशाला फुकटच न्या असे म्हणत दुध उत्पादकांनी फुकट दुध वाटप आंदोलन केले आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
हे देखील वाचा
तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये व शहरातील प्रमुख चौकात दुध गरम करून प्याल्यात भरून वाटप करण्याचे कार्यक्रम सर्व दुध उत्पादक जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले असून ३ मे ते ९ मे या कालावधीत हे आंदोलन केले जाणार असल्याचे नवले यांनी सांगितले. सर्व पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते, नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत. सात दिवस या आंदोलनाच्या समर्थनार्थ ठिकठीकाणी रास्तारोको, धरणे, मोर्चे व घेराव घालून आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे अजित नवले यांनी सांगितले आहे.
लुटणे थांबवा, शरम नसेल तर ‘फुकटच’ न्या असे ग्रामसभांमध्ये ठराव करत सरकारला मोफत दुध पुरविण्याचा पवित्रा दुध उत्पादकांनी घेतला आहे. दिनांक ३ ते ९ मे या काळात राज्यभर चौका चौकात मोफत दुध वाटप सप्ताह आयोजित करण्यात येत आहेत. आंदोलनाच्या तयारीसाठी अहमदनगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी व बीड जिल्ह्यात दुध उत्पादकांचे जिल्हाव्यापी मेळावे घेण्यात आले आहेत. या जिल्ह्यामध्ये मेळावे घेऊन फूकट दूध वाटप आंदोलनाचे निय़ोजन करण्यात आले आहे.