कच्चे तेल 73 डॉलर प्रतिपिंप असतानाही इंधन महागडे
2011 मध्ये कच्चे तेल 118.64 डॉल प्रतिपिंप असतानाही इंधन होते स्वस्त
पुणे : पेट्रोल व डिझेलचे दर उच्चांकी झाले असून, त्यामध्ये सर्वसामान्यांची लूट सुरु आहे. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानाही केवळ महसूल वसुलीसाठी इंधन जादा दराने विकले जात आहे, अशी माहिती आर्थिकतज्ज्ञांनी दिली. 2011 मध्ये युपीए सरकारच्या काळात कच्चे तेल 118.64 डॉलर प्रतिपिंप इतक्या वाजवी दराने खरेदी करावे लागत होते. तेव्हा पेट्रोल राजधानी नवी दिल्लीत 58.37 तर डिझेल 37.75 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात होते. आज कच्चे तेल 73 डॉलर प्रतिपिंप इतके असताना पेट्रोल 82.34 रुपये तर डिझेल 69.01 रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. केंद्र सरकारने कर व अधिभार लावून ही अव्वाच्या सव्वा वसुली सुरु केली असल्यानेच इंधन महाग असल्याचे सांगण्यात आले.
यंदा पेट्रोलियम महसुलात 2.91 टक्क्यांनी वाढीची शक्यता
पेट्रोल व डिझेलच्या दरावर केंद्र सरकारने लावलेला कर व अधिभार यांच्यात पाच वर्षात तिप्पट वाढ झाली आहे. अर्थमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2013-2014 मध्ये केंद्र सरकारला पेट्रोलियम पदार्थांवर कर व अधिभारामुळे 88 हजार 600 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यात 2014-2015 मध्ये वाढ होऊन 1 लाख 5 हजार 653 कोटी रुपये महसूल मिळाला. तर 2015-16 मध्ये त्यात आणखी वाढ होऊन 1 लाख 85 हजार 956 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. 2016-17 मध्ये 2 लाख 53 हजार 254 कोटी रुपयांचा महसूल मिळाला तर आता 2017-18 मध्ये डिसेंबरपर्यंतच 2 लाख 1 हजार 592 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. या वर्षात या महसुलात 2.91 टक्क्यांनी वाढ होईल, असे अर्थखात्याची आकडेवारी सांगते. केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अधिभार व कर आकारत असल्यामुळेच पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असून, त्यात आणखी राज्येही आपले कर आकारत आहेत. या करलुटीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य माणसाला बसत आहे.
भाजप सरकार आल्यानंतर इंधन महागले
पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने सर्वात महाग कच्चे तेल 2011 मध्ये खरेदी केले होते. त्यावेळी कच्च्या तेलाची किंमत 118.64 डॉलर प्रतिपिंप एवढी होती. त्यावेळी दिल्लीत किरकोळ विक्रीच्या पेट्रोलची किंमत 58.37 रुपये प्रतिलीटर एवढी तर डिझेलची किंमत 37.75 रुपये प्रतिलीटर एवढी होती. मे 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कच्च्या तेलाचे भाव 106.85 डॉलर प्रतिपिंप एवढे होते. त्यावेळी दिल्लीत पेट्रोलचे दर 71.41 रुपये प्रतिलीटर तर डिझेलचे दर 56.71 रुपये प्रतिलीटर एवढे होते. आता कच्च्या तेलाचे दर कमी आहेत, तरीही पेट्रोल व डिझेलच्या किमती भडकलेल्या आहेत. मोदी सरकारने कर व अधिभार कमी केले तर सर्वसामान्य नागरिकांना परवडणार्या दरात इंधन मिळू शकते, असेही अर्थतज्ज्ञांनी सांगितले.