विधिमंडळ अधिवेशनातून
पोटनिवडणुकीत हरतो अन् अख्खे राज्य जिंकतो
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. भाजप पोटनिवडणुकीत हरतो आणि अख्खे राज्य जिंकतो. यूपीमध्ये भाजप चार पोटनिवडणुका हरला. मात्र, हे लोकसभेत हरले. कारण हे पोटनिवडणुकीत हरतात आणि अख्खे राज्य जिंकतात, अशा शब्दांत त्यांनी कसबा निवडणुकीवर भाष्य केले. डिस्टन्स एज्युकेशन समजू शकतो. मात्र, आम्ही डिस्टन्स अॅडमिन्स्ट्रेशन अनुभवले म्हणत, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली. तर साखर झोपेतल्या शपथविधीच्या पुढची सुरस कथा देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा शॉक बसेल म्हणत अजित पवारांना चिमटा काढला.
अंगणवाडी सेविकांचे मानधन २० टक्क्यांनी वाढवणार असल्याची घोषणा शुक्रवारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत केली. तसेच दीडशे रुपये खर्चून त्यांच्यासाठी नवे मोबाइल खरेदी करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, ही मानधनवाढ कमी असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.
हे देखील वाचा
आर्थिक ताळेबंद पाहून पेन्शनचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. तर अधिवेशन संपल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेसाठी बैठक घेणार असून 2005 नंतर जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यांना मेजर निवृत्ती जवळ आलेली नाही, आम्ही जुन्या पेन्शन योजनेसाठी नकारात्मक नाही, असेही फडणवीस म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीमध्ये घेतलं जात नाही. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू देशासाठी पदक मिळवतात, पण आपण त्यांचा योग्य तो सन्मान करू शकत नाही, ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे फक्त समित्या नेमून वेळकाढूपणा करण्यापेक्षा याबाबत ठोस व ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. त्यावरील उत्तरात कविता राऊत, दत्तू भोकनळ व अंजना ठमके या खेळाडूंना नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करून वर्ग १ पदी तात्काळ नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालये आणि इतर सर्व सरकारी रुग्णालयात बायोमॅट्रीक हजेरी बंधनकारक करा. आरोग्य विभागीतील वर्ग तीन आणि वर्ग चारमधील पन्नास टक्के जागा रिक्त आहेत. त्या तातडीने भराव्यात, अशी मागणी विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी केली.