जनतेच्या कल्याणासाठी इंधन दरवाढ-गडकरी

0

नवी दिल्ली-सध्या देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरावरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड उठत आहे. सरकारने हे दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी केली जात आहे. मात्र, सरकार असे पाऊल का उचलत नाही, याबाबत अजब युक्तिवाद करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल व डिझेलसाठी अनुदान दिल्यास कल्याणकारी योजनांसाठी सरकारकडे पैसेच उरणार नाही, असे भाष्य केले आहे.

कर्नाटक निवडणूक काळात दरवाढ नव्हती
विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये निवडणुका असताना काही दिवस एका पैशानंही न महागलेले इंधन निवडणुका झाल्यानंतर लागलीच सलग ११ दिवस महागले आणि ८५.३० रुपये प्रति लिटर या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले. मात्र, कर्नाटकाच्या निवडणुकांच्या काळात इंधनाचेदर न वाढवल्यामुळे जनतेच्या कल्याणकारी योजनांना किती फटका बसला याबाबत मात्र गडकरी यांनी काही भाष्य केलेले नाही. एकूणच, विरोधात असताना काँग्रेसच्या पेट्रोल दरवाढीवर कडाडून टिका करणारे भाजपाचे नेते आता मात्र ही दरवाढ आवश्यक असल्याची भूमिका मांडताना दिसत आहेत.

इंधन दरवाढीची परिस्थिती टाळता येणार नाही. इंधनाच्या दरांचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी संबंध असतो. कंपन्यानी महागड्या दरात इंधन खरेदी करुन ते कमी दरात विकले तर सरकारला कंपन्यांना अनुदान द्यावे लागेल, असे गडकरींनी सांगितले. जर हे अनुदान दिले तर कल्याणकारी योजनांसाठी पैसेच शिल्लक राहणार नाही, असे गडकरींनी नमूद केले.