‘फुंगसुक वांगडु’ यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली-आमिर खानच्या गाजलेल्या ‘थ्री इडियटस’ चित्रपट ज्यांच्या रियल लाईफवर आधारीत आहे ते फुंगसुक वांगडु म्हणजेच सोनम वांगचुक यांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.  लडाखसारख्या दूर्गम भागात वांगचुक यांनी शिक्षण, विज्ञानासारख्या क्षेत्रात अमुलाग्र बदल केले आहेत.

सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी या दोन भारतीयांना यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. मॅगसेस पुरस्कार आशिया खंडातील नोबेल पुरस्कार समजला जातो. वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरींगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधले ९५ टक्के विद्यार्थी सरकारी परिक्षांमध्ये नापास व्हायचे.

१९९४ साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ‘ऑपरेशन न्यू होप’ हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमातंर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला कि, १९९६ साली लडाखमध्ये दहावीच्या परिक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण फक्त ५ टक्के होते तेच २०१५ साली ७५ टक्के विद्यार्थी दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झाली.

भारत वाटवानी यांनी रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली. सोनम वांगचुक यांनी निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांची मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड झाली.डॉ. भारत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी कफल्लक झालेल्या रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये घेऊन यायचे. त्यांच्यावर मोफत उपचार करायचे. डॉ. वाटवानी यांनी अशा रुग्णांना मोफत अन्न पाणी आणि आश्रय दिला. त्यांच्या मनोविकारावर उपचार करुन त्यांची त्यांच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणली.