गांदीकोटा किल्लाही दालमियांकडे!

0

कडापा : वृत्तसंस्था दालमिया ग्रुपने दिल्लीतील लाल किल्ला 25 कोटी रूपयांत दत्तक घेतल्याचे उघड झाल्यानंतर आता केवळ लाल किल्लाच नव्हे तर आंध्र प्रदेशातील गांदीकोटा किल्लादेखील केंद्र सरकारने दालमिया ग्रुपला दिल्याचे उघड झाले आहे. 14 व्या शतकातील हा किल्ला केंद्र सरकारच्या दत्तक योजनेनुसार दालमियांना देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील कडापा जिल्ह्यात हा किल्ला आहे. लाल किल्ला दत्तक घेतला त्याच दिवशी म्हणजे 9 एप्रिलरोजी केंद्रीय पर्यटन मंत्रालय आणि पुरातत्व विभागाने दोन्ही किल्ल्यांचा करार दालमिया ग्रुपशी केला आहे. देशातील आणखी किती किल्ले खासगी कंपन्यांना दत्तक दिले आहेत, याविषयी आता चर्चा सुरू झाली असून काही ठिकाणी संतप्त पडसादही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य
दालमिया भारत ग्रुपच्या आधिकार्‍यांनी सांगितले की, आंध्र प्रदेशातील पेन्नर नदीच्या किनार्‍यावर असलेल्या गांदीकोटा किल्ल्याच्या परिसरातच दालमिया ग्रुपचा सिमेंटचा प्रकल्प आहे. यामुळे गांदीकोटा किल्ल्याच्या देखभालीसाठी आणि विकासाठी ते अधिक सोपे जाणार आहे. या किल्ल्याच्या परिसरात मोठा रहिवाशी विभाग असून त्यांना या किल्ल्याच्या देखभाल, विकासात सहभागी करता येऊ शकते. किल्ल्याचा परिसर स्वच्छ करण्याचे मोठे काम असून या भागाचा वापर सध्या शौचासाठी केला जात आहे. येथील स्वच्छतेच्या कामाला आम्ही आधी प्राधान्य देणार आहोत, असे दालमिया भारत ग्रुपचे कार्यकारी संचालक संदीप कुमार यांनी सांगितले.

दोन्ही करारांमध्ये साम्य
दिल्लीतील लाल किल्ला आणि आंध्र प्रदेशातील गांदीकोटा किल्ल्याचा केंद्र सरकार आणि दालमिया ग्रुपशी जो करार झाला आहे, त्यामध्ये खुप साम्य आहे. दोन्ही करार पाच वर्षांसाठी असून त्यानंतर दोन्हीकडून संमती मिळाल्यास ते वाढविण्यात येऊ शकते. बगीचा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, पर्यटकांना बसण्याची आणि थांबण्याची व्यवस्था, सुरक्षेची उपाययोजना अशा सुविधा दालमिया ग्रुपकडून दोन्ही ठिकाणी देण्यात येणार आहेत. या ऐतिहासिक किल्ल्यांचे काही नुकसान झाले आणि त्यासंबंधी भारतीय पुरातत्व विभागाने तसा अहवाल दिल्यास हा करार रद्द केला जाऊ शकतो, अशीही तरतुद या करारात आहे. तसेच स्थानिक नागरिकांकडून कंपनीला कोणतेही शुल्क घेता येणार नाही. येथे देण्यात येणार्‍या सुविधांसाठी पर्यटकांकडून दालमिया ग्रुप शुल्क आकारणार आहे.