पाटना-बिहारमध्ये एका गुंडने १५ वर्षीय मुलीसोबत बंदुकीचा धाक दाखवून लग्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बिहारच्या भागलपूर येथे गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. लग्नाच्या महिन्याभरानंतर अखेर ही मुलगी तिच्या घरी परतली आहे. काही दिवसांपूर्वी गॅंगस्टर पप्पू सिंग याने (४०) अल्पवयीन मुलीसोबत बंदुकीचा धाक दाखवून बळजबरी लग्न करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा आणि पप्पू सिंगचा कसून शोध सुरू केला होता.
पोलिसांच्या कारवाईने घाबरुन सोमवारी पप्पू सिंग मुलीला घेवून त्याच्या गावी राहत्या घरी गेला, त्यानंतर त्याच्या ख-या पत्नीने त्या अल्पवयीन मुलीला पोलिसांच्या स्वाधीन केले. मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या महिन्यात १८ एप्रिल रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले होते.
पुर्णियाची रहिवासी असलेली ही मुलगी सन्हौला गावात आपल्या काकांच्या घरी गेली होती. त्याचवेळी काही गुंड आले आणि पप्पू सिंगने पत्नी म्हणून तुझी निवड केली आहे असे सांगत माझ्या मुलीला बळजबरी घेऊन गेले. अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पप्पू सिंग याच्यावर हत्या, दरोडे आणि अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती भागलपूरच्या पोलिस अधिका-यांनी दिली.