बंगळुरु : गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांच्या हिटलिस्टवर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांच्यासह अनेक साहित्यिक तसेच विचारवंत होते. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने केलेल्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. गिरीश कर्नाड यांच्यासह बीटी ललिता नाईक, निदुमामिडी मठाचे वीरभद्र चन्नामला स्वामी आणि विचारवंत सीएस द्वारकानाथ यांचाही संशयितांच्या हिटलिस्टमध्ये समावेश होता.
सहा जणांना अटक
गौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, के टी नवीन, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीप, मनोहर इडावे आणि परशुराम वाघमारे या सहा जणांना अटक केली आहे. एसआयटीला या संशयित आरोपींकडून हस्तलिखितांच्या नोंदी असलेल्या तीन डायऱ्या मिळाल्या आहेत. यामध्ये सांकेतिक भाषांचा वापर केला आहे. तर गिरीश कर्नाड, बीटी ललिता नाईक यांच्यासह चार जणांची हिंदीत नाव लिहिलेली आहेत. या चौघांनीही कट्टर हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती.
दरम्यान, अटकेत असलेला २६ वर्षीय परशुराम वाघमारे हा गौरी लंकेश यांचा मारेकरी असू शकतो. कारण त्यांची शरीरयष्टी ही हत्येशी संबंधित सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीशी मिळतीजुळती आहे. तसंच तो हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.