बंगळूर-गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली आरोपी परशुराम वाघमारेने दिली असून गौरी लंकेश यांची हत्या कशी केली, याचा घटनाक्रमही परशुरामने पोलिसांना सांगितला. हत्येच्या दोन दिवसांपूर्वी परशुराम बेंगळुरुत पोहोचला होता. हत्येच्या अगोदर दोन दिवस परशुराम गौरी लंकेश यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात जाऊन आला होता, अशी माहिती परशुरामने पोलिसांना दिली.
३ सप्टेंबर २०१७ रोजी बेंगळुरुत आल्यानंतर परशुरामला एका घरात नेण्यात आले. तिथून एका व्यक्तीसोबत मला दुचाकीवरुन गौरी लंकेश यांचे निवासस्थान असलेल्या आर.आर. नगर भागात नेण्यात आले. त्या व्यक्तीने मला गौरी लंकेश यांचे निवासस्थान दाखवले, असे परशुरामने पोलिसांना सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबरला परशुरामला बेंगळुरुत दुसऱ्या खोलीत नेण्यात आले. तिथून एका व्यक्तीसोबत दुचाकीवरुन मी पुन्हा एकदा गौरी लंकेश यांच्या निवासस्थानाजवळ गेलो. परिसराची रेकी केल्यावर आम्ही परतलो. संध्याकाळी पुन्हा एक व्यक्ती दुचाकी घेऊन आला आणि त्याने मला गौरी लंकेश यांची हत्या आजच करायची आहे असे सांगत गौरी लंकेश यांच्या घराजवळ नेले. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत गौरी लंकेश घरी परतल्या होत्या आणि त्यामुळे आमचा पहिला प्रयत्न फसला, असे परशुरामने ‘एसआयटी’ला चौकशी दरम्यान सांगितले.
५ सप्टेंबरला हत्या
५ सप्टेंबरला संध्याकाळी चारच्या सुमारास परशुरामच्या हाती पिस्तूल देण्यात आले. यानंतर परशुराम एका व्यक्तीसोबत दुचाकीवरुन गौरी लंकेश यांच्या घराबाहेर गेला. यावेळी परशुराम गौरी लंकेश घरी परतण्यापूर्वीच तिथे पोहोचला होता. ‘रात्री आठच्या सुमारास गौरी लंकेश घरी परतल्या. त्या कारमधून उतरून घरी जात असताना मी त्यांच्याजवळ गेलो. माझ्या खोकण्याच्या आवाजाने त्या माझ्या दिशेने वळल्या. यानंतर मी पिस्तूलमधून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असे परशुरामने सांगितले आहे. हत्या केल्याच्या रात्रीच परशुराम बेंगळुरुतून पळून गेला होता.
उलटतपासणीचा बराच फायदा
यामागे एक निनावी गट असून तो ५ राज्यांत सक्रिय असल्याचेही एसआयटीमधील एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणांचा तपास करताना सुजित कुमार ऊर्फ प्रवीण याच्या उलटतपासणीचा बराच फायदा झाला. त्यातूनच या गटाचा छडा लागला. प्रवीण या गटासाठी नव्या सदस्यांची नोंदणी करत असे. हा गट मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात सक्रिय आहे. महाराष्ट्रातील हिंदू जागृती समिती आणि सनातन संस्था यांसारख्या हिंदू संघटनांमधून हा गट भरती करत असे, असे सूत्रांनी सांगितले.