गौतम गंभीरवर गुन्हा दाखल; दोन मतदान कार्ड असल्याची ‘आप’कडून तक्रार

0

नवी दिल्ली:दोन वेगवेगळ्या मतदार यादीत नाव नोंदवून दोन्ही मतदार कार्ड मिळविल्याप्रकरणी पूर्व दिल्लीतील भाजपचे उमेदवार माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर विरोधात आम आदमी पक्षाने फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तीस हजारी कोर्टात ही तक्रार करण्यात आली असून त्यावर येत्या १ मे रोजी सुनावणी होणार आहे. गंभीरकडे राजेंद्र नगर आणि करोल बाग या दोन्ही मतदारसंघातील दोन मतदार कार्ड आहेत.

पूर्व दिल्लीचे आपच्या उमेदवार आतिशी यांनीही ही तक्रार दाखल केली आहे. हा फौजदारी गुन्हा असून त्याची गंभीर दखल घेऊन गंभीरला निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले पाहिजे. आम्ही याप्रकरणी तीस हजारी कोर्टात फौजदारी तक्रार केली आहे, असे त्या म्हणाल्या. गंभीरला मतदान करून मतदान वाया घालवू नका. त्यांना लवकरच दोन मतदार कार्ड ठेवल्याप्रकरणी अपात्र घोषित केले जाणार आहे. त्यामुळे मतदान वाया घालवू नका, असे ट्विटही आतिशी यांनी केले आहे. या गुन्ह्यासाठी त्यांना एक वर्षाची शिक्षा होऊ शकते, असेही आतिशी यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी गंभीरने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.