महासभेचे सामनावीर नितीन लढ्ढा

जळगाव शहर महानगरपालिकेची विशेष महासभा विकास कामांच्या मंजुरीसाठी सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध विकास कामांसाठी 85 कोटी रुपयांच्या कामांना महासभेत मंजुरी मिळाली. याआधी झालेल्या महासभेत जो राडा झाला तो संपूर्ण महाराष्ट्राने बघीतला. त्या राड्यानंतर महाराष्ट्रात जळगाव महानगरपालिकेची प्रतिमा मलिन झाली होती. मात्र कालची महासभा अत्यंत शांततेने आणि निर्विघ्नपणे पार पडली. यामध्ये राज्य शासनाकडून मिळालेल्या 42 कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले. ह्या निधीचे योग्य नियोजन ज्यांच्यामुळे झाले ते म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा. गेल्या चार महिन्यांपासून निधीचे नियोजन व्हावे यासाठी स्वतःचा वेळ खर्ची घालत होते व तत्परतेने जळगाव शहराचा विकास व्हावा याचा विचार करत होते. याच बरोबर ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी घेतलेल्या पुढाकाराने विरोधकांनाही आपलेसे केले. जळगाव शहरात महापालिकेत काही नगरसेवक हे स्वतःला जळगाव शहराचे नेते म्हणवतात. मात्र शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय समन्वय घडवण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत.
बंडोबांना केले थंड
शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यापुढे कित्येक आव्हाने होती. त्यातलं एक महत्त्वाचं आणि सर्वात मोठं आव्हान म्हणजे स्वतःच्याच पक्षातली नाराज नगरसेवकांची समजूत घालणे. जळगाव शहरात गेल्या तीन वर्षापासून विकास झाला नाहीये. रस्त्यांच्या समस्येमुळे जळगाव शहरातले नागरिक हे आपल्या प्रभागातील नगरसेवकांवर नाराज आहेत. अशा वेळेस प्रत्येक नगरसेवकाला वाटते की स्वतःच्या प्रभागातील रस्त्यांची कामे व्हावीत. अशा वेळेस जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांची कामे का? असा प्रश्न शिवसेनेच्या नगरसेवकांकडूनच विचारला जात होता. अशा सर्व नगरसेवकांनी समजूत नितीन लढ्ढा यांनी घातली. ज्यात त्यांनी पुढच्या महासभेत सर्वांना निधी दिला जाईल असे आश्वासन दिले. ज्याचे फलित म्हणून ही महासभा निर्विघ्नपणे पार पडली. याच बरोबर 42 कोटी रुपयांच्या निधीतून केवळ शहरातील बाजारपेठ परिसरातीत कामे होत असल्याने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नाराज होते. या सर्व नगरसेवकांना आपल्या प्रभागात देखील कामे करून घ्यायची होती. यामुळे महासभेत कामांना विरोध करावा असे कित्येक भाजपा नगरसेवकांना वाटत होते. अशा वेळेस नितीन लढ्ढा यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला आणि येत्या 58 कोटींच्या कामांमध्ये सर्व समाविष्ट काम करण्यात येतील असे आश्वासन महाजन यांना दिले. ज्यामुळे भाजपचे बंड क्षणार्धात थंड झाले.
रस्त्यांच्या कामांना दिले प्रधान्य
जळगाव शहरातल्या विकासाच्या दृष्टीने नगरसेवकांनी 2019मध्येच 42 कोटी रुपयांचीआपापली कामे महासभेच्या पटलावर घेण्यात यावी असे सांगितले होते. मात्र या निविदांमध्ये कित्येक निविदा या गरजेच्या नव्हत्या. जवळ जवळ 10-12 कोटी रुपयांची कामे ही योगा हॉल बांधून देणे, वॉल कंपाऊंड बांधून देणे, वॉल फेन्सिंग करून देणे अशा प्रकारची कामे होती. मात्र जळगाव शहराच्या दृष्टीने रस्ते बनवणे हे प्राधान्याचे काम असल्यामुळे ते संपूर्ण निविदा बदलून त्या ठिकाणी केवळ आणि केवळ रस्त्यांची कामे घेण्यात आली. याचे पूर्ण श्रेय हे स्वतः नितीन लढ्ढा यांना जाते. त्यांनीच वैयक्तिक लक्ष घालून या सर्व निविदा प्रक्रियेत बदल घडवून आणला.
भाजपाने लढ्ढा यांच्याकडून आदर्श घेण्याची गरज
2018 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेची सत्ता खालसा करत भारतीय जनता पक्षाने जळगाव महापालिकेची सत्ता खेचून आणली होती. मात्र अडीच वर्ष भारतीय जनता पक्ष आपापसात भांडत राहिला.आणि हि भांडणे सोडवण्यासाठी पक्षाअंतर्गत समन्वय राखण्यासाठी त्यांच्याकडे लढ्ढा यांच्या सारखा जेष्ठ नेताही नव्हता. ज्याचा प्रत्यय त्यांना सत्ता गमावून आला. यामुळे भाजपने नितीन लढ्ढा यांच्या काढून आदर्श घेण्याची गरज आहे.
वचनपूर्ती होण्याची अपेक्षा
नितीन लढ्ढा यांनी मोठ्या चाणाक्षपणे सर्वांशी सलोखा राखत सर्वांना विश्वासात घेत जळगाव शहराच्या विकासाचे स्वप्न दाखवले असले तरी येत्या काळात ते दिलेल्या शब्दाला जागतील अशी अपेक्षा आहे. म्हणूनच नितीन लढ्ढा हे कालच्या महासभेचे सामानावीर ठरले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
चिन्मय जगताप 
उपसंपादक , दै जनशक्ती