पतीच्या स्मरणार्थ नेहरू विद्यालयास आरओ वॉटर कुलर भेट

भुसावळ । प्रतिनिधी

तालुक्यातील तळवेल येथील पंडित नेहरू विद्यालयातील शिक्षीका नयना ढाके यांनी पतीच्या निधनानंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. आपल्या कुटूंबाला शाळेमुळे आर्थिक हातभार लागला, अशा या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे या उदात्त भावनेने शिक्षक पतीच्या आठवणी जपण्यासाठी दीड लाख रुपये किंमतीचा आरओ वॉटर कुलर शाळेला भेट देऊन पतीच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला.

येथील द.शि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शिक्षक दिलीप पंडित ढाके यांचे वयाच्या 56 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, त्यांच्या पश्चात नेहरू विद्यामंदिर तळवेल येथील शिक्षिका नयना दिलीप ढाके यांनी शिक्षीकेची जबाबदारी सांभाळत कुटुंबाचा उदरनिर्वाहही चालवला. आता त्या दि. 31 मे रोजी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. निवृत्तीच्या वेळी माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार देणार्‍या शाळेला मदत करणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे तसेच ज्या कर्मभूमीत सेवा केली त्या ठिकाणी आपण काहीतरी देणे लागतो याची जाण ठेवून माझे पती विज्ञान विषयाचे शिक्षक असल्याने ते विज्ञानासोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत असत म्हणून त्या भावनेने शाळेला आर ओ वॉटर कुलर भेट देऊन एक प्रकारे त्यांनी जल ही जिवन है याची प्रचिती आणून दिली. यानंतर त्यांनी ही कल्पना मुख्याध्यापक एस.एस.अहिरे यांच्यासमोर मांडली. यावेळी विद्यार्थ्यांना पाण्यामुळे होणारे आजार दूर करण्यासाठी शाळेला आर ओ वॉटर भेट दिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल, अशी कल्पना त्यांनी मांडली. हा प्रस्ताव बोर्डासमोर मांडल्यावर संस्थेच्या व्यवस्थापनाने या स्तुत्य उपक्रमाला परवानगी दिली. आजारांना आळा बसून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहील, या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.