बापट यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही

0

पिंपरी-चिंचवड :- पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेच्या सत्तेत येण्यापूर्वी शहरातील विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतू सत्तेत आल्यानंतर त्यांनी आश्वासनाकडे तूर्तास दुर्लक्ष केले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत येण्यापूर्वी पालकमंत्री गिरीश बापट यांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, बोपखेल, संरक्षण विभागाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या वल्गना केल्या होत्या. मात्र, वर्षभरात पालकमंत्र्यांनी शहराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत. महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकांमध्ये नाव असूनही ते हजर राहात नाहीत. त्यामुळे बापटांना पिंपरी-चिंचवडची अॅलर्जी आहे का, असा सवाल वाघेरे-पाटील यांनी केले आहे.

कच-याचा प्रश्न गंभीर
पवना, इंद्रायणी या नद्या गटारगंगा झाल्या आहेत. नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. यामुळे डासांची उत्पती वाढली आहे.शहरातील कच-याचा प्रश्न गंभीर बनला असून विविध समस्यांनी शहरवासीय त्रस्त आहेत. परंतु, शहराच्या प्रश्नांकडे सत्ताधा-यांचे लक्ष नाही. पालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. स्थानिक पदाधिका-यांमध्ये एकमत नाही. पदाधिकारी कच-यात गुरफटले आहेत. कच-याच्या किती निविदा काढाव्यात अन् किती नाही. याबाबतच त्यांच्यामध्ये संभ्रम आहे. कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे लक्ष नसल्यामुळे पदाधिका-यांचा चुकीचा कारभार सुसाट सुरु आहे. बापट शहरात फिरकत नाहीत. महापालिकेच्या विविध कार्यक्रमांसाठी बापटांचे पत्रिकेत नाव असते. मात्र, ते हजर राहात नाहीत. शहराच्या प्रश्नांसाठी बैठका होत नाहीत, झाल्यास त्याचा अपेक्षित पाठपुरावा केला जात नाही, असे वाघेरे म्हणाले.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असताना महिन्यातून एक ते दोन वेळा शहरात यायचे. शहरातील प्रश्न सोडवयाचे. शहरातील झाडाची फांदी तुटली, तरी ते अधिका-यांना सांगून ते काम करुन घ्यायचे. त्यांचे शहरावर अत्यंत बारीक लक्ष होते. त्यामुळेच शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. मात्र, भाजपच्या राजवटीत पालकमंत्र्यांचे शहराकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून त्यात शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे वाघेरे यांनी नमूद केले आहे.