जळगाव (डॉ. युवराज परदेशी) : जळगाव जिल्हा भाजपाचा गड मानला जात असला तरी धुळे व नंदुरबार हे काँग्रेसचे पारंपारिक मतदार संघ तर नाशिक व नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी, असे असतांनाही भाजप नेते तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील या पाचही जिल्ह्यातील आठही जागांवर भाजप-शिवसेना युतीच्या शिलेदारांना निवडून आणण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले आहे. यामुळे राज्यात वजनदार मंत्री म्हणून ओळख असलेल्या महाजनांचे दिल्ली दरबारीही वजन वाढले आहे.
भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव क्षेत्र असलेला जळगाव जिल्हा हा १९९१ पासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता याच ठिकाणी गिरीश महाजन यांची ताकद वाढली आहे. जळगाव, धुळे व नाशिक महापालिका निवडणुकीतील दणदणीत यशानंतर गिरीश महाजन व निवडणुकीत विजय हे जणू एक समीकरणच झाले आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळवून देण्याचे शिल्पकार म्हणून गिरीश महाजन यांचे नाव घेतले जात असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रातील आठही लोकसभा मतदार संघांची जबाबदारी महाजन यांच्यावर सोपवली होती. जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे होतेच. रावेरमध्ये खडसेंचे वलय व विद्यमान खासदार रक्षा खडसेंची गत पंचवार्षिकची कामगिरी पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. तसेच येथे खुद्द एकनाथराव खडसे तळ ठोकून होते. मात्र अन्य मतदारसंघाच सर्वकाही आलबेल नव्हते!
जळगाव मतदारसंघात भाजपाचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील गेल्यावेळी विक्रमी मतांनी विजयी झाले होते. यंदाही त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती मात्र एका कथित व्हायरल क्लिपमुळे त्यांचे तिकीट कापले गेले. त्यांच्या जागी विधानपरिषद सदस्या स्मिता वाघ यांना तिकीट जाहीर झाले त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली, निवडणूक नामनिर्देशन अर्जही भरला मात्र भाजपातील अंतर्गत कलहामुळे ऐनवेळी त्यांचे तिकीट कापून चाळीसगावचे युवा आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले. आधीच प्रचारासाठी आठवडाभराचा कालावधी मिळाला असतांना भाजपाच्या एका गटाने त्यांच्या विरोधात काम केले याचे पडसाद उमटत भाजपाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदारामध्ये व्यासपीठावर फ्रिस्टाईल झाली, दुसरीकडे राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याने उन्मेश पाटलांच्या विजयाबाबत खुद्द ते स्वत:च सांशक होते मात्र गिरीश महाजनांचे नियोजन व प्रचारतंत्रामुळे उन्मेश पाटलांच्या गळ्यात विजयाची माळ पडली, याचे श्रेय महाजन यांचेच आहे.
धुळे व नंदुरबार भाजपाचेच
धुळे व नंदुरबार हे एकेकाळचे काँग्रेसचे बालेकिल्ले २०१४ मध्ये मोदी लाटेत भाजपाच्या ताब्यात आले. मात्र धुळ्यात आमदार अनिल गोटेंची बंडखोरी तसेच जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल व उपमहापौर कल्याण अंपळकर यांच्यातील वादामुळे डॉ. सुभाष भामरे यांच्या वाटेत अनेक अडथडे निर्माण झाले होते. तर नंदुरबारमध्ये धनगर आणि आदिवासी सवलतींचा वाद निर्माण झाल्यामुळे हिना गावितांचीही वाट बिकट मानली जात होती. येथेही सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत भाजपाचे उमेदवार निवडणून आणण्याचा शब्द महाजन यांनी खरा करुन दाखविला.
नगरची जागा राज्यभर गाजली
राज्यातील लोकसभा निवडणुकीत यावेळी नगरची जागा खूपच गाजली. ही जागा अनेक वर्षं काँग्रेसचा गड मानली जात होती. काँग्रेसने इथून ज्यांनाज्यांना उमेदवारी दिली त्या सगळ्यांचा विजय झाला. या जागेवर काँग्रेसने तब्बल ४६ वर्षं राज्य केले. २०१४ च्या निवडणुकीत भाजप – शिवसेना युतीचे उमेदवार दिलीप गांधी यांना ६ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. यात दिलीप गांधींचा त्यावेळी दणदणीत विजय झाला. त्यामुळेच नगरची जागा भाजप राखणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. येथून गांधीना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असतांना माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपने लगेचच त्यांना उमेदवारीही दिली. यात महाजनांची भुमिका निर्णायक होती. यामुळे या जागेची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांकडेच सोपवली होती, ती सार्थ ठरवत महाजनांनी सुजय यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले.
राजकीय उंची वाढली
दिंडोरीत भाजपाच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांच्यासह नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे व शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांच्या विजयातही महाजन यांचा मोठा वाटा उचलला. एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील आठही जागांवर युतीचे उमेदवार निवडून आणल्यामुळे महाजन यांची राजकीय उंची वाढली आहे. लोकसभा निवडणुकीतील हे यश पाहता त्यांच्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी देण्यात येईल, हे निश्चित आहे.