राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार

0

महायुती २२५ जागा जिंकणार : ना. गिरीश महाजन यांचा दावा

पाचोरा(प्रतिनिधी)- येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेना युती २२५ पेक्षा अधिक जागा जिंकत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल. तसेच काँग्रेस राष्ट्रवादीला जनता यावेळी पन्नाशीही गाठू देणार नाही, असा विश्वास ना.गिरीश महाजन यांनी पाचोरा येथे आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.
शहरातील महालपुरे मंगल कार्यकायात महायुतीच्यावतीने नवनिर्वाचित खा.उन्मेष पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर खा.उन्मेष पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार डॉ.बी एस.पाटील, शिवसेनेचे समाधान पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, भडगाव नगराध्यक्ष अतुल पाटील, जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, मधुकर काटे, संजय पाटील, डी.एम.पाटील, डॉ.अस्मिता पाटील, अमोल शिंदे, सभापती बन्सीलाल पाटील, तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील, गणेश परदेशी, रमेश बाफना, अ‍ॅड. दिनकर देवरे, नंदू सोमवंशी, डॉ.संजीव पाटील, डॉ.भूषण मगर, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, मुकुंद बिलदीकर,उद्धव मराठे, अंबादास सोमवशी, दत्ता बोरसे, रिपाईचे एस.डी. खेडकर, एकलव्य संघटनेचे समाधान वाघ, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, यांचेसह शिवसेना भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना ना.महाजन म्हणाले की, अनेकांना विधानसभेला भाजपा-सेना युती राहील की नाही अशी शंका व्यक्त करतात. मात्र आमची युती कायम राहणार असून सर्व एकदिलाने काम करतील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. नार-पार योजनेसाठी २० हजार कोटी रुपये कर्ज घेत असून लवकरच हा विषय मार्गी लावणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. तर गिरणेवरील सात बलून बंधार्‍यांची विधानसभेच्या आचारसंहितेपुर्वी कामे सुरू झालेली आपण पाहू शकाल असा शब्द दिला. तसेच पाचोरा तालुक्यातील उतावळीचा प्रश्नबाबत तसेच पाचोरा भडगाव मतदारसंघातील सिंचन पाणी आदी विषयांसादर्भात उद्याच मंत्रालयात बैठक आयोजित केली असल्याचे सांगत सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘लावरे तो व्हिडिओ’ची खिल्ली उडवत त्यांनी राज ठाकरे यांनी सभा घेतलेल्या सर्वच ठिकाणचे आघाडीचे उमेदवार पराभूत झाल्याचे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.अनिल गोटे, माजी खासदार नाना पटोले यांच्यावर टीका केली. ईव्हएम हॅक करणारा आपल्या जळगाव जिल्ह्यातीलच असल्याची टीका जिल्हा राष्ट्रवादिने त्यांच्या बैठकीत केली. गुलाबराव देवकरांना अमुक गावात इतकीच मते कसे मिळाली असे प्रश्न ते विचारतात. मात्र आता जनतेचा केवळ नरेंद्र मोदींच्या नेतृवावर विश्वास असल्याने असे निकाल लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदार संघासह माझ्यावर मावळ मतदारसंघाची देखील जबाबदारी पक्षाने दिली होती. तेथे देखील पक्षाला विजय मिळाला हे पवारांसाठी सूचक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना खा.उन्मेष पाटील यांनी मतदारसंघातील प्रश्‍नांची आपणाला जाण आहे. ना.गिरीश महाजन यांच्या नेतृवात आपण यापुढे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ.किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात आम्ही सर्वाधिक मताधिक्य दिले असल्याने विकास निधीत आम्हाला झुकते माप देण्याची मागणी केली तर यापुढे महायुती जिल्ह्यात एकदिलाने काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

महायुतीच्या बॅनरवरून ‘खडसे’ गायब
पाचोरा येथे आयोजीत महायुतीच्या या कार्यक्रमात मंचावर लावलेल्या बॅनरवर माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांचा फोटो नव्हता. कार्यक्रम महायुतीचा असल्याने त्यावर खडसेंचा फोटो का नाही? अशी कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

आमदार किशोर पाटील यांना कोपरखळ्या
भाषणात ना.गिरीश महाजन यांनी आ.किशोर पाटील यांनी पूर्वी माझाविरुद्ध केलेल्या भाषणाची आठवण काढत त्यांनी माझ्यावर जहरी टीका केल्याची आणि मी मतदारसंघात कोणतेही काम केली नसल्याची टीका केली होती अशी आठवण काढत त्यांना कोपरखळ्या मारल्या. तसेच शेंदूर्णी नगरपालिकेत देखील आमच्या विरोधात रान माजवल्याची गमतीने आठवण काढली. मात्र आता वेळेप्रमाणे भूमिका देखील आम्ही बदल्या असून यापुढे एकत्र काम करत विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढणार असल्याचा शब्द दिला.