राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
जळगाव – गेल्या तीन वर्षापासून एरंडोल व पारोळा तालुक्यात दुष्काळाची परीस्थीती आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असुन गिरणा धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. गिरणा नदीतुन पाणी वाहून जाते. हे वाहुन जाणारे पाणी अंजनी, म्हसवे व बोरी धरणात सोडावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राष्ट्रवादीे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल तालुक्यातील अंजनी धरण व पारोळा तालुक्यातील बोरी आणि भोकरबारी धरणात शुन्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे दरवर्षी पाण्याचे मोठे संकट निर्माण होते. ऑगस्ट महिन्याचा पंधरवाडा उलटूनही या प्रकल्पांमधील जलसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे भविष्यात पाणी संकट दूर करण्यासाठी उपाय केल्यास हे प्रकल्प पुर्नरभरणाने भरता येतील. त्यात अंजनी धरणात जामदा डाव्या कालव्यातुन पारोळा शाखेतुन अंजनी धरणात पाणी सोडल्यास अंजनी धरण भरून घेता येईल. यापुर्वी हा प्रयोग करून अंजनी प्रकल्पाचे पुनरर्भरण करण्यात आले आहे. म्हसवे धरणात गिरणेचे पाणी कॅनाला मार्फत सोडुन म्हसवे धरण भरता येईल. तसेच पाणी पुढे भोकरबारी धरणात टाकता येईल. भोकरबारी धरण भरल्यास अमळनेर तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच पारोळा तालुक्याला वरदान ठरणारे बोरी प्रकल्पात सद्यस्थितीत अत्यल्प कमी पाणीसाठा आहे. पांझण डाव्या कालव्यातुन गिरणा नदीचे वाया जाणारे पाणी बोरी धरणात आतापासून टाकण्यास सुरवात केल्यास बोरी प्रकल्प देखील भरून घेता येईल. तरी या उपाययोजनांसंदर्भात संबंधित अधिकार्यांना सुचना द्याव्या अशी मागणी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अधिकार्यांना पाचारण
आमदार डॉ. सतीश पाटील यांनी निवेदन दिल्यानंतर त्याची जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी तातडीने दखल घेत कार्यकारी अभियंत्यांना बोलावुन घेतले. तसेच कार्यकारी अभियंता बेहरे यांना गिरणेतुन पाणी सोडण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.