‘देशाच्या मुलींना न्याय द्या’; राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूचं आंदोलन सुरू आहे. दरम्यान, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि त्यावर सन्मानजनक तोडगा काढावा अशी विनंती राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे की, सस्नेह जय महाराष्ट्र, आज तुमचं एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच. खरं तर, लक्ष वेधून घेणं हे तेंव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर, पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की, त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावं ही विनंती.

ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदकं बघायला मिळाली आहेत, त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे. अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा, आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चं दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे, म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे.