भूसावळ :- साहित्यिक हे देशातील अतिशय जबाबदार नागरिक असतात , ते समाजास , चळवळीस एवढेच नाही तर देशास दिशा देण्याचे अत्यंत महत्वपूर्ण काम करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्तीक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले .
भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय येथे आर . पी. आय. चे जिल्हा नेते तथा प्रसिद्ध विद्रोही कवि दिवंगत अनिल इंगळे यांच्या प्रथम स्मृतिदिना निमित्त आयोजित श्रद्धांजलि सभेत प्रमुख वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की , अनिल इंगळे यांनी २५ वर्षे सलग साहित्य संमेलनांचे आयोजन केले . फुले आंबेडकर यांचे विचार महाराष्ट्रभर नेले , अनेक दिग्गज साहित्तीक , कलावंत , गायक , गीतकार त्यांनी या माध्यमातून भुसावळ येथे निमंत्रित केले . अनेकांना त्यांनी विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले . अनेकांना मंच उपलब्ध करुन दिला तेंव्हा एक साहित्तीक म्हणून त्यांनी आपली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे . अलिकड काही साहित्तीक आपली जबाबदारी विसरून सवंग व प्रसिद्धिलोलुप लिखाण करीत असल्याचे वाघ यांनी स्पष्ट करुन त्या बद्दल संताप व्यक्त केला . साहित्तीक हा अधिक कल्पनाविलासी नसावा तो कल्पनाविलासी असल्यास काल्पनीक कथा , भाकड कथा जन्माला येतात त्यातून समाजास योग्य दिशा मिळत नाही व प्रसंगी युवक हा सैरभैर होतो . काही प्रसंगी तो शस्त्र हाती घेतो . आज समाजात जे चिंतेचे वातावरण तयार झाले आहे त्यास असे कल्पनाविलासी साहित्तीक जबाबदार आहे असे वाघ यांनी स्पष्ट केले व युवकांनी वास्तववादी विचार करुन नवा सशक्त समाज निर्माण करावा असे आवाहन केले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी अशोक सर्वटकर होते . त्यांनी अनिल इंगळे यांच्या राजकीय कार्याची माहिती देऊन त्यांचा धाड़सीपणा स्पष्ट केला .
याप्रसंगी कामगार नेते अरुण दामोदर यांनी अनिल इंगळे यांच्या राजकीय , सामाजिक , साहित्यिक कार्याची माहिती देऊन त्यांनी अपंग , भिकारी , वेश्या यांच्या करीता केलेला संघर्ष मांडला .
रीपाई चे जिल्हा उपाध्यक्ष विजय साळवे यांनी सांगितले की , इंगळे हे लढ़ाऊ तर होतेच तसेच ते अभ्यासू होते ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले त्यांचे आदर्श होते , त्यांनी अतिशय विद्रोही भूमिकेतुन आपले विचार मांडले आहेत .
नरेश गडवे , पप्पूभाई सुरडकर , सुनील ढ़ीवरे , डॉ. इम्रान , बालुभाऊ सोनवणे , सुनील आराक यांचीही या प्रसंगी भाषणे झाली .
मुख्य संयोजक तथा राष्ट्रीय दलित पँथर चे उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांनी अत्यंत विस्तृतरित्या भूमिका मांडून अनिल इंगळे यांच्या जीवन कार्याचा धावता आढावा मांडला व त्यांचे कार्य पुढं नेन्याचा संकल्प केला . तसेच महाराष्ट्र दलित साहित्य अकादमी तर्फे साहित्य चळवळ अधिक गतिमान करुन पुढील साहित्य संमेलनांचे आयोजन करणे कामी लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही सिद्धार्थ सोनवणे यांनी स्पष्ट केले .
सुरवातीस बुद्ध वंदना घेऊन अनिल इंगळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले , कार्यक्रमास लोक मोठ्या संखेने हजर होते .