पणजी- कर्करोगाने त्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. तिसऱ्यांदा अमेरिकेहून परतल्यानंतर पर्रिकर पुन्हा मंत्रालयात सक्रीय होतील अशी अपेक्षा होती, मात्र प्रकृती साथ देत नसल्याने त्यांना मंत्रालयात जाऊन काम करणे शक्य होत नव्हते. काल पुन्हा त्यांना दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्समध्ये (एम्स) दाखल करण्यात आले.
आता भाजपामध्ये नवा मुख्यमंत्री निवडीसाठी जोरदार हालचाली सुरु आहे. आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
भाजपाच्या कोअर टीम काही मोजक्याच सदस्यांची एक गुप्त बैठकही शनिवारी पार पडली. त्यामध्ये भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांसह नेतृत्वबदलाच्या विषयावर चर्चा करण्याचे ठरवण्यात आले. आज केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होतील व पर्यायी नेतृत्वाची व्यवस्था करतील असा अंदाज आहे.
राज्यात सत्ताकारणाच्या स्पर्धेत गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा, मंत्री विजय सरदेसाई आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे (मगोप) नेते आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यातच मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष भाजपमध्ये विलिन केला तर सरदेसाई राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात.
खासगी हॉस्पिटलमध्ये 4 दिवस उपचार घेतल्यानंतर मनोहर पर्रीकर यांना काल दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडीकल सायन्समध्ये (एम्स) दाखल करण्यात आले आहे. तेथे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. प्रमोद गर्ग यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पर्रिकर यांच्यावर उपचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.