सोने-चांदीच्या बाजारावर मंदीचे सावट

0

भुसावळ: यंदा सततच्या पावसामुळे शेतकरीवर्ग चांगलाच चिंताग्रस्त झाला असून याचा परीणाम बाजारपेठेवर होत असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी दिवाळीच्या सणाला सोने-चांदीच्या बाजारपेठेत बर्‍यापैकी उलाढाल होते. धनत्रयोदशीला बहुतांश नागरीक सोने-चांदी खरेदीला प्राधान्य देतात मात्र यंदा या बाजारपेठेवर मंदीचे सावट निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भुसावळ शहरात किमान 50 दुकाने असून यामध्ये काही कारागीरांचा समावेश आहे. दिवाळीत विविध व्यावसायीकांना सुगीचे दिवस येत असलेतरी यंदा मात्र मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उत्पादने व वाहन बाजारात मात्र तेजी आल्याचे चित्र आहे.

पावसामुळे दिवाळीवर मंदीचे सावट

यंदा सुरूवातीच्या काळात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी व व्यावसायीकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र यंदा पावसाची रीपरीप सुरूच असल्याने शेतकर्‍यांचे कापूस, ज्वारी, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचा परीणाम बाजारपेठेवरही होत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या सणासुदीला बहुतांश नागरीक विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यावर भर देतात. यामध्ये वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर आदीसह सोने-चांदीचे दागिने खरेदीचा समावेश असतो मात्र यंदा दिवाळीच्या सणालाही पावसाची रीपरीप सुरूच असल्याने अनेकांनी विविध वस्तु खरेदीसाठी आपला हात आखडता घेतला आहे. यामध्ये सोने- चांदीच्या खरेदीचाही समावेश असून धनत्रयोदशीला पाहिजे त्या प्रमाणात सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री झाली नसल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष वसंत (नाना) विसपुते यांनी सांगितले. सोने-चांदीच्या बाजारपेठेसह इतर बाजारपेठेवरही मंदीचे सावट निर्माण झाल्याने शेतकर्‍यांसह व्यावसायीकही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

पावसाच्या रिपरिपने आरोग्य बिघडले

गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परीसरात पावसाची रीपरीप सुरू असल्याने याचा परीणाम नागरीकांच्या आरोग्यावर होत असून शहरातील डेंग्युच्या रूग्ण संख्येतही वाढ होत असल्याचे समोर आले आहे. काही नागरीक व लहान बालकांना सर्दी, खोकला व थंडीताप अशा विविध आजाराला सामोरे जावे लागत असून रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. याचाही परीणाम बाजारपेठेतील खरेदीवर होत आहे. रीपरीप पावसामुळे बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

फराळ खरेदीकडे अनेकांचा कल

दिवसेंदिवस दिवाळीच्या सणाचा ट्रेड बदलत असून दिवाळीच्या सणाला घरोघरी तयार केला जाणारा फराळाचा कल आता बाजारात मिळणार्‍या तयार फराळाकडे वाढला आहे. काही गृहिणी आपापल्या परीसरातील कारागीरांकडून फराळ तयार करून घेत आहेत. यामुळे कारागीरांनीही विविध भागात आपली दुकाने सुरू केली असल्याने त्यांना बर्‍यापैकी रोजगाराची संधी मिळाली आहे. बहुतांश शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी वर्ग दिवाळीच्या सणानिमीत्त कर्मचार्‍यांना मिठाईचे वाटप करीत असतात. यामुळे मिठाई विक्रेत्यांनी मिठाई विक्रीसाठी आपापली दुकाने सज्ज ठेवली आहेत.