पुणे : पुण्यात सीएनजीच्या किमतीत ६ रुपयांची घट झाली आहे. आता पुण्यात ८६ रुपये प्रतिकिलोनं सीएनजी मिळणार आहे. तर पीएनजीचे दर ५ रूपये ७० पैशांनी कमी करण्यात आले आहेत. आज पासून नवे दर लागू होणार आहेत.
सीएनजी आणि पाइप्ड स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने गॅसच्या किमतीच्या नवीन सूत्राला मंजुरी दिली आहे. यासोबतच सीएनजी आणि पाइप्ड स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतींवरही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
नैसर्गिक वायूच्या किंमती कच्च्या तेलाच्या निर्देशांकाशी जोडल्या गेल्या आहेत. एपीएम गॅससाठी ४ डॉलर प्रति एमएमबीटीयू (mmBtu) या आधारभूत किमतीला मंजुरी दिली आहे आणि ६.५ डॉलर प्रति एमएमबीटीयू या कमाल मर्यादा किंमतीला मान्यता दिली आहे. एपीएम गॅस म्हणून ओळखल्या जाणार्या पारंपारिक किंवा जुन्या क्षेत्रातून तयार होणारा नैसर्गिक वायू आता अमेरिका, कॅनडा आणि रशियासारख्या देशांसारख्या कच्च्या तेलाच्या किमतींशी जोडला गेल्या आहेत.