FASTag : केंद्र सरकारने वाहनांवर FASTag बंधनकारक केला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच वाहनांवर हा फास्टॅग दिसतो. फास्टॅग हा तुमच्या बँक खात्याशी संलग्न असतो. जर तुमच्या कारवर FASTag लावला असेल, तर तुम्हाला माहिती आहे का?, रिचार्ज केल्यानंतर तुम्ही त्यातील पैसे वापरत नाही तोपर्यंत पैसे त्यात राहतात. त्यामुळे तुम्हाला या पैशावर व्याज मिळाले तर ! दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे म्हटले आहे.
ही याचिका दाखल करुन घेत दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला आणि NHAI ला नोटीस पाठवली असून याबाबत उत्तर मागवले आहे. सरन्यायाधीश सतीश चंद्र शर्मा आणि न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने एका याचिकेवर NHAI आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला नोटीस बजावली. दिल्ली उच्च न्यायालयाने FASTag वर व्याज आणि कार्डमध्ये आवश्यक किमान रक्कम मिळावी या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर NHAI आणि केंद्राकडून उत्तर मागितले आहे. फास्टॅगमध्ये जमा केलेल्या रकमेवर व्याज देण्याचे निर्देश बँकांना द्यावेत, असे याचिकेत म्हटले आहे .
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, FASTag जारी केल्यामुळे हजारो कोटी प्रवासी NHAI किंवा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कोणताही लाभ न देता बँकिंग प्रणालीमध्ये आले आहेत. या संदर्भात उत्तर देण्यासाठी न्यायालयाने चार आठवड्यांची मुदत दिली आहे. पुढील सुनावणीसाठी १० ऑगस्टचा दिवस निश्चित करण्यात आला आहे.