डॉ. युवराज परदेशी
देशातील सर्वात मोठे नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणार्या बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी दूरसंचार कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. भारतातील आघाडीच्या खासगी दूरसंचार कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्या देखील संकटात आहेत. व्होडाफोन कंपनी देशातून गाशा गुंडाळणार असल्याचीही चर्चा अधूनमधून रंगत असते. जगात सर्वाधिक स्मार्टफोन व इंटरनेट वापरकर्त्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, मात्र आजही देशात फोर-जी नेटवर्कची सुविधा व्यवस्थित मिळत नाही. बीएसएनएल व एमटीएनएलकडे तर फोर-जी स्पेक्ट्रमच्या लहरी नसल्यामुळे या कंपन्या खासगी कंपन्यांशी स्पर्धा करु शकत नाही. आपण भारतात फोर-जी सुविधेसाठी धडपडत असलो तरी शेजार्या चीनच्या तीन सरकारी कंपन्यांनी बहुचर्चित ‘फाइव्ह जी’ सेवेचा श्रीगणेशा केला. चीनने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसमवेत 50 शहरांमध्ये ‘फाइव्ह जी’ सेवा सुरू करीत असल्याची घोषणा केली आहे. उठसुट चीनचा व्देष करतांना त्यांच्याकडून जे चांगले आहे ते शिकणे देखील आवश्यक आहे. तरच आपण चीनला तगडी टक्कर देवू शकू.
एकेकाळी बीएसएनएल आणि एमटीएनएल हे दोन्ही देशात सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क म्हणून ओळखले जात होते. आजही कित्येक गावांमध्ये फक्त बीएसएनएल नेटवर्क मिळते. तर जिथे खासगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नाही अशा ठिकाणीही बीएसएनएलचे नेटवर्क मिळत असल्याने त्याचा वापर एकेकाळी सर्वाधिक होता. मात्र खासगी टेलिकॉम कंपन्या आणि महत्त्वाचे म्हणजे जिओच्या उदयानंतर बीएसएनएल टेलिकॉर्म कंपनीला उतरती कळा लागली. तब्बल 1.65 लाख कर्मचारी असलेली बीएसएनएल कंपनी गेल्या काही वर्षांपासून तोट्यात आहे. रिलायन्स, जिओ आल्यानंतर तर आणखीच तोटा वाढला. 2017-18 या आर्थिक वर्षात बीएसएनएलला 31 हजार 287 कोटींचा तोटा झाला. 2019च्या आर्थिक वर्षात बीएसएनएलला एकूण 13 हजार 804 कोटींचा तोटा झाला आहे. फायनाशियस एक्स्प्रेसच्या अहवालानुसार बीएसएनएल आणि एमटीएनएल 1.65 लाख कर्मचार्यांना अद्याप आकर्षित रिटायरमेंट प्लॅन देणे आणि कंपनीवरील कर्ज फेडणे आणि त्यानंतर कंपनी बंद करण्यासाठी सरकारला साधारण 95 कोटींचा खर्च येण्याची चिन्हे आहेत. अनेक कर्मचार्यांचे वेतन थकल्याने तेही देणे बाकी आहे. बीएसएनएल सर्वात जास्त तोटा सहन करणारी टॉप पीएसयू आहे. दर महिन्याच्या महसूल आणि खर्चातील अंतरामुळे आता कंपनीचे कामकाज सुरु ठेवणे हा चिंतेचा विषय बनला आहे. सध्या परिस्थिती एका अशा लेव्हलवर पोहोचली आहे जिथे पुरेशा इक्विटीचा समावेश केल्याशिवाय कंपनीचे कामकाज सुरु ठेवणे जवळपास अशक्य आहे. गेल्या काही काळापासून बीएसएनएल आणि एमटीएनएल सातत्याने तोट्यात असण्यास अनेक कारणे आहेत. यंत्रणा कार्यान्वीत असली तरी अनेकदा डायल करूनही एखादा कॉल लागला तर ती मोठी गोष्ट म्हणावी लागेल. रेंजमध्ये असतानाही आऊट ऑफ रेंज, नॉट रिचेबल अशी उत्तरे तर सातत्याने नेटवर्क बिझीचा कहर यामुळे मुळातच दूरसंचारचे ग्राहक वैतागले आहेत. या दोन्ही कंपन्यांकडे 4 जी स्पेक्ट्रमच्या लहरी नसल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत त्या मागे पडल्या होत्या. परंतु, केंद्राने आता या दोन्ही कंपन्यांना 4 जी स्पेक्ट्रम उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. भारतात दूरसंचार क्षेत्रामध्ये सध्या रिलायन्स जिओ या कंपनीचा बोलबाला आहे. या कंपनीचे वाढते प्रस्थ लक्षात घेऊन
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आयडिया आणि व्होडाफोन या कंपन्यांचे 31 ऑगस्ट 2018 रोजी विलनीकरण करण्यात आले होते. या विलीनीकरणाबरोबरच व्होडाफोन आयडिया ही नवी मोबाइलसेवा पुरवठादार कंपनी अस्तित्वात आली. या विलीनीकरणामुळे अस्तित्वात आलेल्या नव्या कंपनीने अग्रस्थानी असलेल्या भारती एअरटेल या कंपनीला दुसर्या स्थानावर सारले होते. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने मोबाइलसेवा व्यवसायात आक्रमकपणे प्रवेश केल्याने व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या दोन्ही कंपन्यांवर कर्जाचा बोजा असल्यानेही त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर या कंपन्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मध्यंतरी व्होडाफोनने भारतातून गाशा गुंडाळण्याची तयारी केल्याची चर्चा होती परंतु कंपनीने नंतर ती फेटाळून लावली. खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत बीएसएनएलचा कुठेच टिकाव लागत नाही व सध्याची त्यांची वाटचाल पाहिली तर भविष्यातही कुठेच लागणार नाही. परिणामी भारतातील ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावला लागतो. दुसरीकडे बीजिंगमध्ये झालेल्या तंत्रज्ञान परिषदेत चीनने ‘फाइव्ह जी’ सेवेची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. डिसेंबर अखेरीस चीनमधील पन्नासहून अधिक शहरांमध्ये ही सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ‘फाइव्ह जी’ने चीनमधील सरकार आणि उद्योगांचे लक्ष वेधले आहे. ‘फाइव्ह जी’च्या सेवेकडे वरदान म्हणूनही पाहिले जात आहे. या माध्यमातून क्षणार्धात चित्रपट डाउनलोड करण्यासाठीच नव्हे तर, सेल्फ ड्रायव्हिंग कार, रोबोटिक सर्जरी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक नियंत्रण होण्याची शक्यता आहे. जास्त गाजावाजा न करता प्रगती साधून जगाला चकित करायचे ही बाब चीनला चांगलीच जमते हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. इकडे भारतात आपण कोणतेही काम सुरु करण्याआधीच प्रचंड गाजावाजा करीत असतो. चीनच्या आधी अमेरिकेमध्ये काही महिन्यांआधीच ‘एटी अँड टी’, ‘व्हेरिझॉन’ आणि ‘टी मोबाइल’ या सेवा पुरवठादारांनी ग्राहकांसाठी काही निवडक शहरांमध्ये फाइव्ह जी नेटवर्क उपलब्ध करून दिले होते. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज ग्राहक अतिशय वेगवान इंटरनेटचा आनंद घेत आहेत. अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत अतिशय कमी कालावधीत चीनने ‘फाइव्ह जी’ सेवा सुरू करून तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेला कडवी टक्कर दिली आहे. आज अनेक बाबतीत चीन भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी व हाडवैरी असला तरी काही गोष्टी चीनकडून नक्कीच शिकण्यासारख्या आहेत.