तुषार गांधी यांच्यासह अनेक विचारवंतांचा समावेश
मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला सत्तेतून खाली खेचून काढण्यासाठी विविध क्षेत्रातील समविचारी लोकांनई एकत्र येऊन मुंबईत ‘मित्र लोकशाही’चे (फ्रेंडस डेमोक्रॉसी) या फोरमची स्थापना केल्याची घोषणा केली. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण, डॉ. विवेक कोरडे, शुभा शमीम, अॅड. राज कुलकर्णी आदींनी या फोरमची घोषणा मुंबई मराठी पत्रकार संघात केली.
देशात भाजपचे सरकार आल्यानंतर आणीबाणीपेक्षाही भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकशाही मुल्ये पायदळी तुडवले जात आहेत. फॅसिस्ट शक्तींनी देशात कहर माजवला आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार हे लोकशाहीविरोधी असल्यामुळे देशात येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्यासारख्या विचारांचा पुरस्कार करणाऱ्या शक्तींचा पराभव करणे हे या फोरमचे मुख्य उद्दिष्टे असल्याची माहिती तुषार गांधी यांनी दिली.
फोरमची व्याप्ती ही देशभर वाढवली जाणार असून, यात लेखक, साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, महिला संघटनेच्या नेत्या, उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असलेले प्रतिनिधी यांना सामील करून घेतले जाणार आहे. जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्यात आणि देशात परिसंवाद, व्याख्याने, बैठका, कार्यशाळा यांचे एक नियोजन आणि त्याचे एक वेळापत्रक लवकरच तयार केले जाणार असल्याची माहिती यावेळी अॅड. राज कुलकर्णी यांनी दिली.