आता प्रत्येकाच्या कॉम्प्युटरवर सरकार ठेवणार नजर; यंत्रणा नियुक्त !

0

नवी दिल्ली- केंद्र सरकारने कोणत्याही नागरिकाचा फोन कॉल टॅप करणे, फोनमधील डेटा आणि कॉम्प्युटरमधील माहितीवर लक्ष ठेवण्यासाठी आता १० एजन्सीज नियुक्त केल्या आहेत. त्यामुळे आता कोणाच्याही कॉम्प्युटरमधील माहितीवर पाळत ठेवले जाणार आहे. या अगोदर कॉम्प्युटरमधील माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृह खात्याची लेखी परवानगी लागायची, पण आता त्याची गरज लागणार नाही.

पण या सगळ्यावरून पक्षांमध्ये मोठा वाद पेटला आहे. हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे, असे आरोप होत आहे. दहशतवादी कारवाया आणि इतर गंभीर गुन्ह्यांना आळा घालणे, हा या मागचा जाहीर हेतू असला तरी त्यासाठी गोपनीयतेचा किती भंग करायचा, यालाही मर्यादा असायला हव्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, देशातील १० सुरक्षा यंत्रणा नागरिकांच्या कंप्युटरमधील कोणताही डेटा पाहू शकते. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी आणि एमआयएमनं कडाडून विरोध केला आहे. प्रत्येक नागरिकावर नजर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी ‘या प्रकरणातली संपूर्ण माहिती आमच्याकडे नाही. पण जर आपल्या कॉम्प्युटरवर कोणी नजर ठेवणार असेल तर आपण ऑरवेलियन स्टेटकडे जात आहोत असे सांगितले आहे. ‘ खरे तर, जॉर्ज ऑरवेलियनने एक पुस्तक लिहिले होते ज्याचे नाव ‘1984’ होते. या पुस्तकात नागरिकांना व्यक्तिस्वातंत्र्य देण्यात आले नव्हते. तर सरकार प्रत्येकावर नजर ठेवते असे या पुस्तकात नमूद करण्यात आले होते.