आसाम-आसाममधील नौगाव जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्याची अमानवी वर्तणूक समोर आली. कार्यक्रमादरम्यान स्थानिक सेवानिवृत्त शिक्षक मंचावर येत खराब रस्त्याची माहिती देत होते. त्यावेळी अचानक केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांनी आपल्या जागेवरून उठून त्या ज्येष्ठ शिक्षकाच्या हातातील माइक हिसकावून घेतला. त्यांना बोलूही दिले नाही. विशेष म्हणजे हे शिक्षक अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच मंचावर बोलण्यास आले होते.
स्थानिक आमदारांना रस्त्याबाबत अनेकवेळा पत्र लिहून कल्पना दिली. पण आतापर्यंत कोणतेच पाऊल उचलले नसल्याचे ते म्हणाले. एक वर्षांहून अधिक काळ झाला असून अमोलपट्टीतील बीबी रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. परंतु, नवीन सरकार आणि नव्या आमदारांकडून आम्हाला अजूनही आशा आहेत. याबाबत संबंधित विभागाला अनेकवेळा पत्र लिहिले पण कोणतीच कार्यवाही झाली नाही, असे त्यांनी म्हटले. त्याचवेळी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन हे आपल्या खुर्चीवरून उठले आणि थेट त्या शिक्षकापर्यंत पोहोचले.
सर्वांसमोरच त्यांनी त्यांच्या हातातील माइक हिसकावून घेतला. तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांबरोबर का बोलत नाही, खास उद्देश घेऊन तुम्ही इथे आला आहात, असे मला वाटते. हे सर्व खोटे आहे, असेही गोहेन यांनी म्हटले.