पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही देशातील एकमेव अग्रेसर बँक ठरली आहे. बॅंकेला गेल्या आर्थिक वर्षात ३५१ कोटी ३९ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून, बॅंकेच्या निव्वळ ‘एनपीए’ शून्य टक्क्यात असून, ढोबळ एनपीएमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट होऊन तो ४.५१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, अशी माहिती बॅंकेचे संचालक व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.सध्या बँकेच्या एकूण ठेवी ११ हजार ४८१ कोटींच्या झाल्या आहेत.
मार्च २०२३ अखेरपर्यंत एकूण ७९७४ कोटी ३ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे.
बँकेतील एकूण गुंतवणूक ७७९२ कोटी रुपये असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये ८.२६ टक्केनी वाढ झाली आहे. चालू वर्षी बँकेच्या शाखेमध्येच शेतकऱ्यांना अवघ्या २० रुपयांत ई सातबारा उपलब्ध करून देण्याची सोय दिली आहे. मार्केटयार्डयेथील भूविकास बँकेचा ३५ हजार चौरस फुटांचा भूखंड बँकेने २६ कोटी ७१ लाख रुपयांना विकत घेतला आहे.
जिल्हा बॅंक ही राज्यातील सर्व बँकांमध्ये पहिल्या क्रमांकामध्ये आहे. देशात ज्या ५३ शेड्यूल बँका आहेत. त्यामध्ये वसूल भाग भांडवल व बॅंक निधीमध्ये देखील जिल्हा बॅंक अग्रेसर असून, बँकेचा प्रोग्रेसिव्ह कव्हरेज रेश्यू ४१२ टक्के आहे. क्षारपड जमिनीत सुधारणा करण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी प्रत्येकी ९६ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे अध्यक्ष प्रा. दुर्गाडे यांनी सांगितले आहे. बँकेने आता गुगल पे “ही” सुविधा उपलब्ध करून दिली आहे.