पालकमंत्रीपद म्हणजे जहागिरी नाही !

दानवेंनी सुनावलं : संभाजीनगर नियाजन समितीच्या बैठकीत राडा

संभाजीनगर । प्रतिनिधी । –

पा लक मंत्रीपद म्हणजे काही जहागिरी नाही अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना सुनावले. निधी वाटपावरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड राडा झाला. अंबादास दानवे यांचा रौद्रावतार पाहून सभागृहात उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी आवाक झाले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्ह्यातील विविध तालुक्यांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पावसाळी अधिवेशनानंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक वादळी ठरणार असे संकेत होते. अगदी तशीच वादळी बैठक झाली. निधीवाटपावरून जसा अधिवेशनात गदारोळ झाला तसाच गदारोळ नियोजन समितीच्या बैठकीतही झाला. ठाकरे गटाचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्याला निधी मिळत नसल्याची तक्रार केली. यावरून भडकलेल्या पालकमंत्री भुमरेंनी आणि अब्दुल सत्तारांनी आमदार राजपूत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना सुनवायला सुरूवात केली. त्यानंतर अंबादास दानवे यांनी रौद्ररूप धारण करत आपल्या खुर्चीवरून उठून भुमरे-सत्तारांवर तुटून पडले. उभय नेत्यांमधला हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत गेला. निधी वाटपावरून सुरू झालेले हे महाभारत चर्चेचा विषय ठरले.