गुजरातमध्ये दलित व्यक्तीला बेदम मारहाण करून हत्या

0

राजकोट-एका दलित व्यक्तीची भिंतीला बांधून जनावराप्रमाणे बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार गुजरातमधील राजकोट येथे घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात पाच व्यक्तींविरोधात भादंवि कलम ३०२ नुसार तसेच अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. राजकोट जिल्ह्यातल्या शापर गावातील एका कंपनीत काही अज्ञात लोकांनी रविवारी सकाळी कचरा वेचक दलित व्यक्तीला भिंतीला बांधून बेदम मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला.

जिग्नेश मेवानी यांनी केले व्हिडिओ व्हायरल
मारहाण करणारे लोक आणि दलित व्यक्तीविरोधात कचरा उचलण्यावरून वाद झाला होता. हा वाद पुढे इतका वाढला की मारहाण करणाऱ्या लोकांनी संबंधीत दलित व्यक्तीला जनावरासारखी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ गुजरातमधील दलित आमदार जिग्नेश मेवानी यांच्या हाती लागला आणि त्यांनी तो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. पोलिसांपर्यंत ही माहिती गेल्यानंतर त्यांनी याची गंभीर दखल घेत भादंवि ३०२ नुसार हत्या आणि अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) पाच अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली आहे.

कचरा वेचण्याचे करीत होते काम
मुकेश वानिया असे मारहाणीत मृत्यू पावलेल्या दलित व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती सुरेंद्रनगर जिल्ह्याच्या परनाला गावची आहे. मुकेश यांची पत्नी जया आणि अन्य एक महिला सविता यांच्यासोबत ते रडाडिया कंपनीजवळ कचरा वेचण्याचे काम करीत होते. त्यानंतर कंपनीतून पाच लोक बाहेर आले आणि या तिघांशी कुठल्यातरी कारणावरून वाद घालायला लागले. हा वाद वाढतच गेला त्यानंतर ते मारहाणीवर उतरले. या पाच लोकांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दोन्ही महिलांना बाहेर काढण्यात आले आणि मुकेश यांना पकडून भिंतीला बांधण्यात आले. त्यानंतर त्यांना जनावराप्रमाणे लाथा-बुक्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, त्यात मुकेश यांचा मृत्यू झाला.