गुजरातमध्ये आत्मघातकी हल्लाचा इशारा; हाय अलर्ट जाहीर

0

गांधीनगर-गुजरातमध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती गुजरात पोलिसांना दिली आहे. राज्य गुप्तचर यंत्रणेने हा अलर्ट जारी केला असून मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्मघातकी हल्लेखोरांच्या पथकात हैदराबादमधल्याच एकाचा समावेश आहे.

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहोम्मद संघटनेशी संबंधित असलेल्या या आरोपीची पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये भूमिका होती. आरोपीबरोबर एका वृद्ध महिला असून दोघांची रेल्वे स्टेशनवर घातपात घडवण्याची योजना आहे असे या अहवालात म्हटले आहे. आदिल अहमद दारने त्याच्या 10 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिल्ली, गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांचा उल्लेख केला आहे.

हाय अलर्ट घोषित केल्यानंतर गुजरात आणि आसपासच्या भागातील प्रत्येक संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आले आहे. किनारपट्टी आणि पाकिस्तान सीमेला लागून असणार्‍या भागात गुजरात पोलिसांनी गस्त वाढवली आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला आदिल अहमद दार या आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवली. यात 40 जवान शहीद झाले. त्यानंतर लगचेच पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.