गुलाबराव पाटील म्हणजे ‘गुलाबो गँग,’ त्यांनी आता सभेत घुसून दाखवावेच

संजय राऊतांचे खुले आव्हान

जळगाव – गुलाबराव पाटील म्हणजे गुलाबो गँग आहेत. त्यांनी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या सभेत घुसून दाखवावे, असे जाहीर आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिले आहे.

उद्धव ठाकरे यांची उद्या रविवारी (ता. 23 सायंकाळी जळगावमध्ये जाहीर सभा आहे. त्यापूर्वी जळगावमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सभेच्या तयारीसाठी जळगावमध्ये आलेल्या संजय राऊतांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत गुलाबराव पाटील तसेच शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.

गुलाबराव पाटील यांचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले, मला जळगावात घुसून तर दाखवा, असे आव्हन दिले होते. मी आलो. काल जळगावमध्ये आल्यानंतर मला अडवण्यासाठी कुणी उंदिर आलाय का?, हे आम्ही शोधत होतो. पण, कुणी सापडले नाही. काल मी आलो तेव्हा शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. या शिवसैनिकांच्या गर्दीत कुणी घुसेल?, असे वाटत नाही.

जनता ठाकरे शिवसेनेतच

संजय राऊत म्हणाले, गद्दरांनी चोऱ्या, लफंगेगिरी करून सत्ता मिळवली आहे. काही भागात खोटी कागदपत्रे दाखवून जमीन बळकावली जाते, तशाचप्रमाणे खोट्या कागदपत्रांच्या आधारे गद्दारांनी शिवधनुष्य हातात घेतला आहे. मात्र, जळगावमध्ये मूळ शिवसेना, मूळ शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे. जळगावमध्ये शिवसेना आमची म्हणजे ठाकरे गटाचीच आहे.

जनता मतपेटीतून उत्तर देईल

संजय राऊत म्हणाले, आमदार, खासदार पक्ष सोडून गेले म्हणजे शिवसेना कमकुवत झालेली नाही. 2024 च्या निवडणुकीत जळगावमध्ये शिवसेना कुणाची?, याचे उत्तर मिळेल. मोठ्या कालावधीनंतर जळगावमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. त्याला उदंड प्रतिसाद मिळेल. त्यानंतर जनता मी मतपेटीतून गद्दाराना उत्तर देईल. एकेकाळी शिवसेना या गद्दारांची आई होती. आज त्याच शिवसेनेवर हे सडलेल्या जीभांचे लोक टीका करत आहेत.