इस्लामाबाद: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात-उद-दावा’चा प्रमुख हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधील गुजरानवाला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या आरोपांवरून हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पहिल्या अमेरिका दौऱ्यावर जाणार होते असून त्याआधी ही कारवाई करण्यात आली. हाफिज सईद याच्याविरोधात दहशतवादाचे अनेक आरोप असून, २६/११ मुंबईवरील हल्ल्याचा तो प्रमुख सूत्रधार आहे. अमेरिकेनेही सईदवर एक कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, तो लाहोर शहरामध्ये मोकाट फिरत होता असून त्याच्यावर ठोस कारवाई होत नव्हती. दरम्यान, तीन जुलै रोजी दहशतवादविरोधी पथकाने हाफिज सईदसह ‘जमात उद दावा’च्या १३ जणांविरोधात २३ फिर्याद दाखल केली आहे. यामध्ये दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याचा प्रमुख आरोप असून, पंजाब प्रांतातील विविध शहरांमध्ये या फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन घेण्यासाठी लाहोरवरून गुजरानवालाकडे जात असताना हाफिजला अटक करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर त्याला दहशतवादविरोधी कोर्टात सादर करण्यात आले, तेथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.