आंध्र प्रदेश, हैद्राबादमध्ये पावसाचा थैमान; २४ तासात १४ मृत्यू

0

हैद्राबाद: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाने थैमान घाटे आहे. आंध्र प्रदेश व तेलंगाना राज्यात तसेच हैद्राबादमध्ये पावसाचा तांडव सुरु आहे. गेल्या २४ तासात आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसामुळे हैदराबादमधील अनेक भागांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मदतकार्य करण्यासाठी शहरातील रस्त्यावर बोटीतून प्रवास करावा लागत आहेत. दुर्दैवाने हैदराबादमध्ये २४ तासात १४ जणांना जीव गमवावा लागला आहे. तेलंगणा सरकारने दोन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.

वातावरणात झालेल्या बदलांमुळे गेल्या २४ तासांपासून पाऊस सक्रिय झाला असून, आंध्र प्रदेश व तेलंगणात थैमान घातलं आहे. आंध्र व तेलंगणातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, राजधानी हैदराबादमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पाऊस कायम असल्यानं हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गही पूराच्या पाण्याखाली गेला आहे. दम्मईगुडा परिसरात पावसाचं पाणी वाढल्यानं एक कार वाहून गेली. जुन्या हैदराबाद शहरात मंगळवारी मध्यरात्री १० घरांना लागून असलेली संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली. या भीषण घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ बालकांचा समावेश आहे. शमशाबादमधील गगनपहाड परिसरातही पावसामुळे घराची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आढावा घेत असून मदतकार्य पोहोचविण्याचे आदेश दिले आहे. एसडीआरएफच्या तुकड्या पावसामुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पावसामुळे उस्मानिया विद्यापीठ व जवाहलाल नेहरू टेक्निकल विद्यापीठाच्या आज व उद्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.