असा होतोय पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा

0

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून मोदी वाराणसी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून येथे एका शाळेतील मुलांसोबत ते वाढदिवस साजरा करणार आहेत. एका स्वयंसेवी संस्थेकडून चालवण्यात येणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मोदी संवाद साधणार आहेत. तसेच आपल्या वाढदिवशी जवळपास 600 कोटी रुपयांच्या योजनांचा शुभारंभही मोदी करणार आहे.

पंतप्रधान मोदी वाढदिवसानिमित्त काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घेऊन पूजा करणार आहेत. त्यानंतर अनेक नव्या प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. यामध्ये बाबतपूर-शिवपूर रस्त्याचं विस्तारीकरण, रिंग रोडचा पहिला टप्पा यांच्यासह बनारस हिंदू विद्यापीठातील काही प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, शाळकरी मुलांसोबत ‘चलो जिते है’ हा लघुपट पाहतील. हा लघुपट मोदींच्या आयुष्यावर आधारित आहे.

शुभेच्छांचा वर्षाव
देशभरातून राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्ती आज मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांकडूनही ट्विटरच्या माध्यमातून मोदींना सदिच्छा दिल्या जात आहेत. सकाळपासूनच सोशल मीडियावर #HappyBdayPMModi आणि #HappyBirthDayPM हे ट्रेंडिगवर आहेत.

 

आज मोदींचा वाढदिवस असल्याने त्यांच्या जीवनावर आधारित ‘चलो जिते हैं’ हा लघुपट सर्वत्र दाखविला जातो आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एकत्र हा लघुपट बघितला.